मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन्स, अनुदान योजना : कदंबच्या नव्या 20 ई बसगाड्यांचे लोकार्पण
प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कदंब परिवहन महामंडळाच्या 20 नवीन ई-बसगाड्यांचे काल गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. प्रत्येक पेट्रोल पंपावर तसेच सरकारी जागेत इलेक्ट्रिक वाहने अधिभारीत करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदान योजनाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी आता इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. इलेक्ट्रिक वाहनांमुळे कार्बन व इतर प्रदूषण कमी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
बांबोळी येथे 20 ई-बसगाड्यांचे लोकार्पण केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कदंबकडे किमान 100 ई-बसगाड्या असल्या पाहिजेत. आगामी काही महिन्यांत आणखी बसेस येणार आहेत. कदंबकडे सध्या 51 ई-बसगाड्या असून त्या सर्व मिळून एकूण 54 लाख कि. मी. धावल्या आहेत. या 20 नवीन बसगाड्या पणजी स्मार्ट सिटीसाठी वापरण्यात येणार असून त्यामुळे लोकांचा प्रवास सुखदायक होणार आहे, असेही ते म्हणाले.

बसेस पोलिसस्थानकांशी लिंक्ड
हरित उर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे आता काळाची गरज बनली आहे. ई गाड्यांमुळे कार्बनचा एकंदरीत स्तर 3600 एवढा कमी झाला असून त्यातील प्रवास जनतेच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येते. त्या नवीन बसगाड्या अत्याधुनिक असून त्यातील कॅमेरा पोलिसस्थानकांशी संलग्न (लिंक) आहे. दिव्यांगांना त्यात चढणे-उतरणे या करीता विशेष सोय करण्यात आली आहे. आता या 20 गाड्या ताफ्यात आल्यामुळे एकूण ई-गाड्यांची संख्या 71 झाल्याचे ते म्हणाले.
वर्षअखेर कदंबात 198 ई-बसेस
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ई-वाहनात बदलण्याचे ध्येय सरकारने ठेवले असून कदंबच्या ई-गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. वर्षअखेर 198 ई-बसगाड्या कदंब महामंडळात सामील करुन घेतल्या जातील. महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार रूडॉल्फ फर्नांडिस व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. तुयेकर, गुदिन्हो यांची यावेळी भाषणे झाली.
बससंदर्भात अॅपवर मिळणार माहिती
कदंबचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी ई-बसगाड्यांची माहिती दिली. या बसेस पणजी शहरात कुठे, किती वाजता येणार ते मोबाईल अॅपवर कळणार आहे. ती यंत्रणा लवकरच पणजी शहरात सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सीसी टिव्ही कॅमेरा जूनपासून होणार कार्यान्वित
वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून स्मार्ट सिटी अंतर्गत राजधानी पणजीत व सभोवताली पणजीच्या प्रवेशद्वारावर सिग्नलच्या ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटिव्ही पॅमेरे येत्या 1 जूनपासून कार्यरत होणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. यापूर्वी ते पॅमेरे 22 मेपासून कार्यरत होणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. नंतर त्यात बदल कऊन जनजागृती होण्यासाठी त्याची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली होती. आता 8 दिवसात जनजागृती झाली आहे, असे गृहीत धऊन ती कार्यवाही 1 जूनपासून सुरू करण्याचे सरकारने ठरविले आहे.








