पाण्याचा अपव्यय टाळा, पाणीपुरवठा मंडळाचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात पाणी टंचाईचे संकट आवासून उभे ठाकले आहे. काही भागात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा अपव्यय न करता जपून वापर करावा, असे आवाहन एलअँडटीने केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा या पाण्याचा वापर दैनंदिन वापरासाठी केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही कंपनीने दिला आहे.
वाढत्या उन्हामुळे जलाशय आणि तलावातील पाणी पातळीतही घट होऊ लागली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीतही घट होत आहे. विशेषत: हिडकल जलाशयावर बेळगावबरोबर संकेश्वर आणि हुक्केरी शहराचा भार आहे. शहरात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर वाहनांसाठी, बांधकामासाठी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी आणि इतर कामांसाठी करू नये, अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रु. दंड
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पाण्याचा गैरवापर करून नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास टोल फ्री क्र. 18004255656 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









