खंडाळा :
गणेश विसर्जनावेळी कृत्रिम तलावाचा वापर करण्यासाठी, नागरिकांना प्रोत्साहित करून निर्माल्याचे योग्य प्रकारे संकलन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विंग येथील ग्रामपंचायतीला नागराजन यांनी भेट दिली. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वॉटर मीटर, कृत्रिम विसर्जन तलावाची पाहणी करत माझी वसुंधरा ६.० अंतर्गत वृक्षारोपण नागराजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, माहेरघर महिला ग्राम संघातील महिलांशी संवाद साधला. विंग गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शासनाच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन गावाचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन करत नागराजन यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करावी. गणेश विसर्जनावेळी कृत्रिम तलावाचा वापर करून विसर्जन निर्माल्य एकत्रित करावे, अशा सूचना देत विंग येथे नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून बोटिंग सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होऊ शकते, अशी संकल्पना मांडली.
यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय लाड, विस्तार अधिकारी सुनील बोडरे, महादेव चौधरी, सरपंच स्वप्नील तळेकर, उपसरपंच पूनम तळेकर, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण पडळकर, तालुका समन्वयक अतुल गायकवाड, उमेद अभियानचे व्यवस्थापक प्रवीण खुडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.








