निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना सल्ला
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचारात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (एआय) जबाबदारीने आणि पारदर्शकतेसह करण्याचा सल्ला दिला आहे. यासंबंधी आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सल्ला जारी केला आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी एआयद्वारे जारी होणाऱ्या सामग्रीचा योग्य स्वरुपात अवश्य खुलासा करावा, असे आयोगाने म्हटले आहे. जर एखादा राजकीय पक्ष किंवा उमेदवार एआयद्वारे कुठलेही छायाचित्र, व्हिडिओ किंवा अन्य सामग्रीचा वापर करत असेल तर त्याच्या स्रोताची माहितीचा खुलासा अवश्य करण्यात यावा, असे आयोगाकडून म्हटले गेले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे सातत्याने निवडणुकीत एआयच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चुकीची माहिती फैलावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल प्रशासनाला सतर्क रहावे लागणार आहे. तसेच अशाप्रकारची चुकीची माहिती फैलावण्यापासून रोखण्यासाठी वेगाने कारवाई करावी लागणार आहे असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना म्हटले होते. तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आयोगाने सोशल मीडियाच्या सावध वापराबद्दल निर्देश जारी केले होते.
डीपफेकचा वापर
दिल्ली विधानसभा निवडणुकीत डीपफेक आणि भ्रामक संदेश फैलावण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. अलिकडेच पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या विरोधात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची एआर-जनरेटेड छायाचित्रे तसेच व्हिडिओ पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट केल्याप्रकरणी 5 एफआयआर नोंदविले आहेत. यातील व्हिडिओकरता एआय-डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. याचबरोबर सोशल मीडिया आणि एआयच्या गैरवापराला रोखण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.









