राज्यातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
नागपूर
जगातील कोरोना नव्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील आता खबरदारी घेण्यात येत आहे. यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता ‘मास्क वापरा, चिंता नको’, असे आवाहन मुंख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले आहे. तसेचे राज्यातील सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घेण्यासह त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱयांशी संवाद साधून कोविडशी संबंधीत वर्तन व पंचसूत्रीचे काटेकोर पालन केले जाईल ते पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये दिले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.7 हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या 2216 कोविड रुग्णालये असून 1 लाख 34 हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगितले आहे.
पंचसूत्री पाळण्याच्या सुचना
चाचण्या, ट्रकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्यात ‘कोविड टास्क फोर्स’ची होणार पुनर्रचना
या बैठकीत नव्याने ‘कोविड टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला होता. नव्याने पुनर्रचना होत असल्याने त्यात आणखी काही तज्ञ डॉक्टरांचा तसेच प्रशासकीय अधिकाऱयांचा समावेश केला जाणार आहे. ‘कोविड’ची जागतिक स्थिती तसेच राज्यात पुन्हा ‘कोविड’ची परिस्थिती उद्भवल्यास आपण सज्ज आहोत का? वैद्यकीय सुविधा रुग्णालयातील पुरेसे बेड्स याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्यात देवस्थानांमध्ये लवकरच मास्कसक्ती?
कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्यात आता देवस्थांमध्ये लवकरच मास्कसक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वधर्मीय प्रार्थनास्थाळे ही श्रद्धेची ठिकाणे असल्याने साहजिकच तेथे गर्दी होते. कोरोना संसर्गासाठी गर्दी पोषक ठरते. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात नाही. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती असताना प्राथमिक उपाययोजना म्हणून मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईचे मुंबादेवी मंदिर येथे मास्कसक्ती केली आहे. कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर येथे पुजाऱयांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिर्डी साई मंदिर येथेही मास्क वापरणे सुरू करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातही मास्क सक्ती करण्यात आली आहे. आता नाताळच्या सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता चर्चमध्येही मास्क वापरण्याविषयी विचार होण्याची शक्यता आहे.









