वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक अॅथलेटिक्स क्षेत्रातील वेगवान धावपटू म्हणून ओळखला जाणारा युसेन बोल्ट 1 ऑक्टोबर रोजी भारत भेटीवर येणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात तो सहभागी होणार आहे.
पुमा औद्योगिक कंपनीतर्फे दोन दिवसांच्या कार्यक्रमाला 30 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. क्रीडा क्षेत्रातील अव्वल उत्पादन कंपनी म्हणून पुमाकडे पाहिले जाते. 1 ऑक्टोबर रोजी बेंगळूर एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात हा प्रदर्शनीय सामना खेळविला जाणार आहे. या प्रदर्शनीय सामन्याला जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू व बॉलिवूड क्षेत्रातील अभिनेते उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनीय सामन्यात बोल्ट पूर्वार्धात बेंगळूर एफसीचे तर उत्तरार्धात मुंबई सिटी एफसीचे प्रतिनिधीत्व करेल. अॅथलेटिक्स क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर युसेन बोल्टने फुटबॉल क्षेत्रात प्रवेश केला. पण फुटबॉलवरील त्याचे नितांत प्रेम असल्याने त्याने काही सामनेही खेळले आहेत. बोल्टने ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदके मिळविण्याचा विश्वविक्रम केला आहे.









