वृत्तसंस्था / रिदाल (जॉर्जिया)
पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुषांच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अमेरिकेने आपली पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेसाठी सुरू असलेल्या दुहेरी राऊंड रॉबिनच्या पात्र फेरी स्पर्धेमध्ये अर्जुन महेशच्या नेतृत्वाखालील अमेरिकन संघाने कॅनडा, बर्मुडा आणि अर्जेंटिना या संघाचा पराभव करत आपली पात्रता सिद्ध केली आहे. अमेरिकन संघाचा पात्रता फेरीतील अद्याप एक सामना बाकी आहे.
पात्रता फेरीतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात अमेरिकेने कॅनडाचा 65 धावांनी पराभव केला. या पात्रता फेरीचा निम्मा टप्पा संपला असून अमेरिकेने तीन मोठे विजय नोंदवित आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्थान मिळविण्याचा इतिहास घडविला आहे. अमेरिकन संघातील गोलंदाजांनी आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर बर्मुडा आणि अर्जेंटिना यांचा पराभव करत आपल्या संघाला दहा गुण मिळवून दिले. आता पात्रतेसाठी अमेरिकेकडे पुरेसे गुण झाले आहेत. अमेरिकन संघातील आघाडीचा फलंदाज अमरिंदरसिंग गिलने तीन सामन्यात 199 धावा जमविल्या आहेत. तर अनिश राय आणि साहीर भाटीया या गोलंदाजांनी प्रत्येकी 7 गडी बाद केले आहेत.
2024 साली द. आफ्रिकेत झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आघाडीचे 10 संघ 2026 च्या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. तसेच 2026 ची ही स्पर्धा झिम्बाब्वे भरवित असल्याने यजमान देश म्हणून त्यांना थेट प्रवेश दिला आहे. उर्वरीत पाच संघ विभागीय पात्र फेरी स्पर्धेतून निवडले जातील. आता झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या 2026 च्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेले संघ पुढील प्रमाणे….- झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाक, न्यूझीलंड, श्रीलंका, द. आफ्रिका, विंडीज, अमेरिका, तांझानिया, अफगाण, जपान व स्कॉटलंड









