पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत अमेरिका व आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामना रद्द झाल्याने आयर्लंड आणि यजमान अमेरिका या दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. यासह अमेरिकन संघाने सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर पावसामुळे पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे, 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमधील स्थान अमेरिकेने निश्चित केले आहे. पाकला साखळी फेरीतून बाहेर पडल्याचा दणका बसला असून 2026 मधील टी 20 वर्ल्डकपमध्ये त्यांना थेट प्रवेश मिळणार नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे.
शुक्रवारी अमेरिका व आयर्लंड यांच्यातील सामन्याला नियोजित वेळेनुसार 8 वाजता सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र सामन्याआधीच पावसाची रिपरिप सुरु होती. यामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून ठराविक वेळेने पाहणी करणे सुरुच होते. पावसाची रिपरिप सुरुच राहिल्याने शुक्रवारी रात्री पंचांनी पाहणी केल्यानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता, सुपर-8 मध्ये अमेरिकेला तीन सामने खेळावे लागणार आहेत. अमेरिकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ही मॅच अँटिग्वामध्ये 19 जूनला होईल. याशिवाय अमेरिका आणि वेस्ट इंडिज देखील आमने सामने येणार असून उभय संघातील सामना दि. 21 जूनला बार्बाडोसमध्ये होईल. याशिवाय, 23 जूनला त्यांचा आणखी एक सामना होईल.
पाकिस्तानला दुहेरी झटका
टी 20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला दुहेरी धक्का बसला आहे. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत झालेला अमेरिकेविरुद्धचा पराभव आता त्यांना पुढील दोन वर्ष सतावणार आहे. वास्तविक, 2024 टी 20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये स्थान न मिळवू शकल्यामुळे पाकिस्तानला 2026 टी 20 विश्वचषकात थेट प्रवेश मिळणार नाही. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषक 2026 चा भाग होण्यासाठी पाकिस्तानला प्रथम क्वालिफायर सामने खेळावे लागतील. क्वालिफायर सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतरच पाकिस्तानला या स्पर्धेत सहभागी होता येईल. आयसीसीच्या नियमांनुसार, सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या संघांना पुढील टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी थेट तिकीट मिळणार आहे. या लिस्टमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या बड्या संघांसह आता अमेरिकेचे नावही समाविष्ट झाले आहे.









