वृत्तसंस्था/माँटेव्हिडिओ (उरुग्वे)
2026 मध्ये बेल्जियम व नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी अमेरिकन महिला हॉकी संघाने आपली पात्रता सिद्ध केली आहे.
पात्र फेरीच्या स्पर्धेतील झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकन महिला हॉकी संघाने उरुग्वेवर थरारक विजय मिळवून आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेचे तिकिट आरक्षित केले. पात्र फेरीच्या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने चिलीचा पराभव केला. आता पात्र फेरी स्पर्धेमध्ये अर्जेंटिना व अमेरिका यांच्यात अंतिम सामना खेळविला जाईल. दरम्यान अर्जेंटिना महिला हॉकी संघाने यापूर्वीच आगामी महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे तिकिट निश्चित केले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2024-25 च्या हॉकी प्रो-लीग स्पर्धेत दुसरे स्थान मिळविल्याने अर्जेंटिना विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला. दरम्यान नेदरलँड्स या स्पर्धेत पहिल्या स्थानावर राहिला. 2025 साली झालेल्या पॅन अमेरिकन चषक हॉकी स्पर्धेत अमेरिकेने पहिल्या दोन क्रमांकांमधील आपले स्थान निश्चित केले आहे.
पात्र फेरीच्या स्पर्धेत अमेरिकेचा ब गटात समावेश होता. अमेरिकेने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मेक्सिकोचा 10-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. त्यानंतर अमेरिकन महिला संघाने चिलीवर 5-2 अशी मात करत आपल्या गटात आघाडीचे स्थान मिळविले. टोबॅगो संघाने या स्पर्धेतून उशिरा माघार घेतल्याने अमेरिकेचा संघ ब गटात पहिल्या स्थानावर राहिला. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या होणाऱ्या आगामी महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरणारा अमेरिकेचा संघ हा पाचवा आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्स यांनी या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद भूषविल्याने या दोन्ही संघांना थेट प्रवेश देण्यात आला आहे.









