वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याबद्दल वक्तव्य केले आहे. यापूर्वी त्यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचे आणि शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शविण्याचे श्रेय त्यांनी घेण्याचा प्रयत्नही केला. काश्मीर प्रश्नावर बोलताना ट्रम्प यांनी कदाचित ‘हजार वर्षांनंतर’ या समस्येवर तोडगा निघेल, असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून काश्मीर समस्येला 1500 वर्षे जुना मुद्दा म्हटले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी करारावरील सहमतीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले होते. भारत आणि पाकिस्तान दोघांचेही नेतृत्व खूप मजबूत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि अटल नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. तसेच दोन्ही देशांनी सध्याचा संघर्ष थांबवण्याची गरज व्यक्त करताना तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा आणखी मजबूत होईल, असेही ट्रम्प म्हणाले होते.









