कुटुंबीयांसह दिल्लीत उतरणार : पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे आजपासून पत्नी उषा आणि तीन मुलांसह भारत दौऱ्यावर येत आहेत. ते सोमवारी दिल्लीच्या पालम एअरबेसवर उतरतील. त्यांचा हा दौरा चार दिवसांचा असेल. या काळात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. व्हान्स आणि त्याचे कुटुंब दिल्ली व्यतिरिक्त जयपूर आणि आग्रा येथेही भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी जेडी व्हान्स आणि त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान मोदी सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता जेडी व्हान्स यांना भेटतील. या बैठकीत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर बोलणी होतील. तसेच दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर ही चर्चा महत्त्वाची आहे. द्वयींमध्ये व्यापार, शुल्क आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली जाईल. दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी द्विपक्षीय व्यापार करार केला जाणार आहे.
जेडी व्हान्स, त्यांची पत्नी उषा आणि इवान, विवेक व मिराबेल ही त्यांची तीन मुले सोमवारी सकाळी 10 वाजता दिल्लीच्या पालम एअरबेसवर पोहोचतील. वरिष्ठ केंद्रीय मंत्री त्यांचे विमानतळावर स्वागत करतील. त्यानंतर ते आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये राहणार आहे. त्यांच्यासोबत पेंटागॉन आणि परराष्ट्र विभागातील किमान पाच वरिष्ठ अधिकारी असतील. पेंटागॉन हे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय आहे.
24 एप्रिल रोजी व्हान्स कुटुंब जयपूरहून अमेरिकेला रवाना होईल. तत्पूर्वी जेडी व्हान्स आणि त्यांचे कुटुंब दिल्लीतील प्रसिद्ध स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देतील. पारंपारिक भारतीय हस्तकला उत्पादने खरेदी करण्यासाठी ते शॉपिंग कॉम्प्लेक्सला देखील भेट देऊ शकतात. 22 एप्रिल रोजी ते अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देतील, ज्यात आमेर किल्लाही समाविष्ट आहे. मंगळवारी दुपारी जेडी व्हान्स जयपूरमधील राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये एका परिषदेला संबोधित करणार आहेत. व्हान्स यांच्या पत्नी उषा या हिंदू असून त्यांचा हा प्रथमच भारत दौरा आहे. त्या मूळच्या आंध्रप्रदेशातील आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
चर्चा प्रगतीपथावर
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारासंबंधीची चर्चा प्रगतीपथावर आहे. या चर्चेचा प्रारंभ फेब्रुवारीपासूनच झाला असून दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा अपवाद वगळता सर्व देशांवर लागू केलेल्या व्यापार शुल्काला 3 महिन्यांची स्थगिती दिली आहे. या स्थगितीच्या कालावधीतच भारत आणि अमेरिका एक प्राथमिक व्यापारी करार करण्याच्या विचारात आहेत.
आशयपत्रावर स्वाक्षऱ्या
व्यापार करार करण्याआधी दोन्ही देशांच्या आधिकाऱ्यांनी एका आशयपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे व्यापार करार प्रक्रिया अधिक गतिमान होत आहे. दोन्ही देशांना लाभदायक ठरेल, असा एक व्यापार करार येत्या तीन महिन्यात केला जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली असून त्यासाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. तसा करार झाल्यास भारताच्या दृष्टीने ती समाधानाची बाब असेल. तसेच, त्यामुळे व्यापार संघर्षही टाळला जाणार आहे.









