युद्ध न थांबवल्यास शांतता करारातून माघार घेण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ पॅरिस
अमेरिका लवकरच रशिया-युक्रेन शांतता करारातून बाहेर पडू शकते. येत्या काळात रशिया आणि युक्रेनने युद्ध संपवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही तर अमेरिका शांततेसाठीचे प्रयत्न सोडून देईल, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होऊन जवळपास 90 दिवस झाले आहेत. या काळात रशिया-युक्रेन युद्ध सोडवण्याबाबत अमेरिकेच्या पुढाकाराने चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. परंतु ट्रम्प प्रशासनाला शांतता प्रस्थापित करण्यात फारसे यश मिळालेले नाही.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी गुरुवारी पॅरिसमध्ये युरोपियन आणि युक्रेनियन नेत्यांची भेट घेतली. ट्रम्प प्रशासनाच्या युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अमेरिकेने शांततेसाठी एक योजना सादर केली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते या योजनेचे सर्व पक्षांनी कौतुक केले आहे. तथापि, या योजनेत समाविष्ट संभाव्य प्रस्ताव अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.









