वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
येमेन देशातील ‘हुती’ या दहशतवादी आणि सागरी चाचेगिरी करणाऱ्या संघटनेच्या अनेक स्थानांवर अमेरिका आणि ब्रिटन यांनी संयुक्तरित्या हल्ला चढविला आहे. तांबडा समुद्र आणि अरबी समुद्रांमध्ये हुतीच्या दहशतवाद्यांनी व्यापारी नौकांना लक्ष्य बनविण्याचे सत्र आरंभले आहे. त्याला अटकाव करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती दोन्ही देशांनी दिली आहे.
दोन्ही देशांच्या वायुदलांची युद्ध विमाने आणि टॉमाहॉक क्षेपणास्त्रे या हल्ल्यासाठी उपयोगात आणण्यात आली. हुतीची 12 हून अधिक स्थाने नष्ट करण्यात आली. व्यापारी नौकांवर हल्ले करण्याची या संघटनेची क्षमता कमी करणे हा या हल्ल्यांचा उद्देश होता. तो सफल झाल्याचे अमेरिकेने नंतर स्पष्ट केले.
आणखी हल्ले चढविणार
शुक्रवारी करण्यात आलेले हल्ले प्रखर होते. तथापि, त्यांच्यामुळे तांबड्या समुद्रातील हुतीचा उपद्रव थांबला नाही, तर आणखी तीव्र हल्ले करण्यात येतील. हुतीला कायमचा धडा मिळेपर्यंत हल्ले सुरू राहतील. सर्व समुद्र आणि महासागर व्यापारासाठी मुक्त राहिले पाहिजेत. कोणीही त्यांच्यात अडथळा आणल्यास त्याची गय केली जाणार नाही, असे अमेरिका आणि ब्रिटनने स्पष्ट केले आहे.
तांबड्या समुद्राचे महत्त्व
तांबडा समुद्र हा भूमध्य समुद्र आणि अरबी समुद्र यांना जोडणारा सागर आहे. याच सागरातून युरोपचा दक्षिण आशियाशी बव्हंशी व्यापार चालतो. त्यामुळे हा सागर मुक्त असणे हे या व्यापारासाठी महत्त्वाचे आहे. विशेषत: भारताशी व्यापार करण्याचा युरोपसाठी हा एकच मार्ग आहे. अन्यथा, व्यापारी नौकांना आफ्रिका खंडाला वळसा घालून दक्षिण आशिया आणि भारताशी व्यापार करावा लागणार आहे. पण हे अंतर खूप जास्त असल्याने वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढून व्यापारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून तांबडा समुद्र मोकळा ठेवणे हे भारत, दक्षिण आशिया आणि युरोपसाठी महत्त्वाचे मानले गेले आहे.









