रशियाच्या दबावात अध्यक्ष बायडेन यांची घोषणा : चीनकडे जपानची रसायनास्त्र
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सप्टेंबर 2023 पर्यंत अमेरिकेकडील सर्व रसायनास्त्रs (केमिकल वेपन्स) नष्ट करणार असल्याची घोषणा अध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. मागील महिन्यात चीन आणि रशियाने एक संयुक्त वक्तव्य जारी करत अमेरिकेवर रसायनास्त्रs नष्ट करण्यासाठी दबाव टाकला होता. केमिकल वेपन कन्व्हेंशनचा (सीडब्ल्यूसी) सदस्य असूनही अमेरिकेने स्वत:कडील रसायनास्त्रs नष्ट केली नसल्याचे या वक्तव्यात नमूद करण्यात आले होते.
पुढील आठवड्यात अमेरिका आणि सीडब्ल्यूसीचे सदस्य एका परिषदेसाठी एकत्र येणार आहेत. यात जगाला रसायनास्त्रांपासून मुक्ती मिळवून देण्यावर चर्चा केली जाणार आहे. आम्ही जगासमोर उदाहरण प्रस्थापित करत नेतृत्व करत आहोत. अमेरिका नेहमीच अशाप्रकारच्या धोकादायक अस्त्रांना जमविण्यास विरोध करत राहणार आहे. अन्य देशांना देखील सीडब्ल्यूसीसोबत काम करण्यासाठी प्रेरित करू असे व्हाईट हाउसकडून म्हटले गेले आहे.
रशियाचा दावा
2017 मध्ये स्वत:कडील सर्व रसायनास्त्रs नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे. परंतु युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशिया यात रसायनास्त्रांचा वापर करू शकतो अशी भीती अमेरिका आणि ब्रिटनने व्यक्त केली होती. तर तत्पूर्वी रशियाने अमेरिकेवर युक्रेनमध्ये रसायनास्त्र तसेच जैविक अस्त्रांची निर्मिती केल्याचा आरोप केला होता. आम्ही कधीच रसायनास्त्रांची निर्मिती केलेली नाही असे चीनचे म्हणणे आहे. परंतु चीनमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने रसायनास्त्रांचा मोठा साठा सोडला होता. हा साठा आता नष्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
रसायनास्त्र म्हणजे काय?
ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स म्हणजेच ओपीसीडब्ल्यूनुसार रसायनास्त्रांमध्ये विषारी रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्यासाठी केला जात असतो. रसायनास्त्रांमुळे क्षणभरात हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच असंख्य लोकांना विविध आजारांमुळे तडफडून मृत्यूला सामोरे जावे लागू शकते. रसायनास्त्र सामूहिक विनाशाच्या अस्त्रांच्या श्रेणीत सामील आहेत.









