पेंटागॉनच्या ‘लीक’ अहवालांमधून खुलासा ः दक्षिण कोरियावर युक्रेनला शस्त्रास्त्र पुरविण्याचा दबाव
@वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यावरच पाळत ठेवली जात असून हे काम अन्य कुणी नव्हे तर अमेरिकेकडूनच केले जात आहे. यासंबंधीचा खुलासा पेंटागॉनच्या लीक झालेल्या गोपनीय युद्ध दस्तऐवजांमधून झाला आहे. अमेरिका सातत्याने झेलेंसकी आणि त्यांच्या अधिकाऱयांदरम्यान होत असलेले संभाषण इंटरसेप्ट करत आहे, म्हणजेच हे संभाषण ऐकत आहे. तसेच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरविण्यासाठी दक्षिण कोरियावर दबाव टाकण्यासह तेथील अध्यक्षांची हेरगिरीही केल्याचे लीक झालेल्या फाईल्समधून समोर आले आहे.
अमेरिकेने केवळ झेलेंस्की नव्हे तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक योल आणि त्यांच्या दोन सर्वात मोठय़ा अधिकाऱयांचीही हेरगिरी केली आहे. अमेरिकेने दोन्ही अधिकाऱयांमधील संभाषण टिपले आहे. या संभाषणात युक्रेनला शस्त्रास्त्रs देण्यासंबंधी चर्चा केली जात होती. युक्रेनऐवजी पोलंडला शस्त्रास्त्रs पुरवून आपण अमेरिकेच्या दबावाखाली आलो नसल्याचे सिद्ध करू शकतो असे एका अधिकाऱयाचे म्हणणे होते.
तोफा अमेरिकेला पाठविण्याची तयारी दक्षिण कोरियाने मागील वर्षी दर्शविली होती. तसेच दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून या तोफा युक्रेनला न पाठविण्याबद्दल आश्वासन मागितले होते. अमेरिका ही शस्त्रास्त्रs स्वतःपुरती मर्यादित ठेवेल असा विश्वास दक्षिण कोरियाचे अधिकारी यी मुन हुई यांना नव्हता असे उघड झालेल्या फाइल्समधून समोर आले आहे.
हेरगिरीची चौकशी करणार दक्षिण कोरिया
एकीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी अमेरिकेकडून हेरगिरी होण्याच्या वृत्तात काही नवे नसल्याचे सांगितले आहे. तर दक्षिण कोरियात यावरून गदारोळ निर्माण झाला आहे. तेथील विरोधी पक्ष यावरून सरकारवर टीका करत देशाच्या सार्वभौमत्वावर अमेरिकेकडून आक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत आहेत. या कृत्यासाठी अमेरिकेने माफी मागावी असे तेथील विरोधी पक्षनेते ली जे म्यूंग यांनी म्हटले आहे. तर दक्षिण कोरियाने हेरगिरी प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. अध्यक्ष अन् त्यांच्या अधिकाऱयांमधील संभाषण कुठल्याही प्रकारे उघड होऊ शकत नसल्याचे सरकारकडून म्हटले गेले. 26 एप्रिल रोजी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष अमेरिकेच्या दौऱयावर जाणार असून यापूर्वीच या हेरगिरीचा खुलासा झाला आहे.
अमेरिकेचे स्पष्टीकरण
हेरगिरीची माहिती समोर आल्यावर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्यात आले असून ते खरे नाहीत असे ऑस्टिन यांनी म्हटले आहे. तर दस्तऐवजांमधील हे बदल रशियाकडून खोटी माहिती पसरविण्यासाठी केलेले असू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. तर मूळ दस्तऐवजातील शस्त्रास्त्र पुरवठा, सैन्य सामर्थ्य आणि अन्य गोपनीय माहितीशी निगडित छायाचित्रे समोर येणे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी दर्शवित आहे. बिडेन प्रशासन सातत्याने हे दस्तऐवज डिलिट करण्याचा प्रयत्न करत आहे.









