अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे उघड झाल्याने एकच हाहाकार माजलेला आहे. युव्रेनसहित इस्त्रायल, फ्रान्स, ऑस्टेलिया, दक्षिण कोरिया आदी देशांबद्दलची माहिती यात असल्याने अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्ध आणि जागतिक राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची ही गुप्त माहिती मित्रपक्षांमध्ये अविश्वास उत्पन्न करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात पेन्टागॉन अर्थात अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गोपनीय कागदपत्रांची जाहिर वाच्यता सोशल मीडियावरून सर्वत्र झालेली आहे. सुरुवातीला डिस्कॉर्ड नामक गेमिंग प्लॅटफॉर्मवरील चॅटरुममध्ये ही अमेरिकन गोपनीय आणि संवेदनशील माहिती प्रसारित करण्यात आली. यात अमेरिकेच्या पॅन्टागॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या युक्रेनसहीत नाटोतील आपल्या मित्र देशांबाबत असलेल्या विचारांची पोलखोल झालेली आहे. या गोपनीय माहितीनुसार युक्रेनमधील युद्धात रशियाचे पारडे जड असल्याचे मत व्यक्त झाल्याचे दिसून येते. तसेच युक्रेन कशाप्रकारे कमकुवत बनला, याबाबतचे चित्रही यात स्पष्ट केलेले आहे. अमेरिकेच्या गेल्या तीन महिन्यांतील निर्णयांकडे पाहता, पेन्टागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या याच निष्कर्षांचा हा परिणाम असल्याचे दिसून येते. युक्रेनकडून सातत्याने शस्त्रपुरवठा, रणगाडे, क्षेपणास्त्रे, रणगाडे पुरविण्याची मागणी युरोपियन देश आणि अमेरिकेकडे केली जात आहे. मात्र रशियाला वेठिस धरण्यासाठी युक्रेनला पुढे करणाऱ्या नाटो सदस्य देशांनी सध्याच्या युद्धजन्य स्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांना वाकुल्या दाखवल्या जात आहेत.
अमेरिका आपल्याकडील रणगाडे देण्यासाठी चालढकल करत आहे. तसेच एफ 16 विमाने पुरविण्याची झेलेन्स्कीची मागणी अमेरिकेकडून अव्हेरण्यात आली आहे. अमेरिकेच्या एकेका निर्णयाचे उत्तर पेन्टागॉनच्या कागदपत्रात सापडत आहे. युक्रेनचे युद्धासंदर्भातले निर्णय कशाप्रकारे चुकीचे आहे, याची माहिती विविध स्तरावर मिळत आहे. त्यामुळेच पेन्टागॉनच्या अहवालानुसार युक्रेनसाठी शस्त्रास्त्रांची मदत कुचकामी ठरत असल्याचे नमूद केल्याचे दिसून येते. साहजिक पेन्टागॉनच्या या माहितीचा परिणाम राजकीय नेत्यांच्या निर्णयप्रक्रियेवर होत असल्याने युक्रेनला देण्यात येणाऱ्या मदतीबाबत सावधगिरी बाळगण्यात येते. त्यामुळेच अमेरिकेकडून युक्रेनला होत असलेल्या शस्त्रपुरवठ्यात सातत्याने विलंब होत असतो. सार्वजनिक झालेल्या गोपनीय कागदपत्रांतून उघड झालेली आहे. मात्र युक्रेनच्या प्रवक्त्यांनी हा शत्रू पक्षाचा डाव असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कुटनिती आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील अशी अत्यंत गुप्त माहिती सार्वजनिक झाल्याने अमेरिकन प्रशासन प्रचंड दबावाखाली आलेले आहे. सार्वजनिक झालेल्या गुप्त माहितीनुसार अमेरिकेकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, लष्करी अधिकारी व तिन्ही दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरु असल्याची बाब उघड झालेली आहे. तसेच गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या युद्धाबाबत प्रत्यक्ष स्थिती आणि त्यावर केलेले अमेरिकेच्या अत्त्युच्च्य सैन्य अधिकाऱ्यांचे भाष्य या उघड झालेल्या गुप्त माहितीत असल्याचे दिसून आले आहे. हे भाष्य युक्रेनचे ध्यैर्य कमी करणारे असून ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या धोरणाला प्रतिकूल असे असल्याने त्याचा विपरित परिणाम नजिकच्या काळात दिसण्याची शक्यता आहे.
इस्त्रायल संदर्भात या गुप्त कागदपत्रांत आक्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात इस्त्रायल, अमेरिका आणि नाटो सदस्यांबरोबर असला तरी युक्रेनला मदत करण्याबाबत द्विधा स्थितीमध्ये आहे. या देशाने जरी हल्ल्याबाबत आगावू सूचना देणारी यंत्रणा जरी युक्रेनला दिलेली असली तरी घातक हत्यारे देण्यात चालढकल करत आहे. अमेरिकेच्या इस्त्रायलबाबतच्या या नोंदीमुळे त्याची युक्रेनबाबत असलेली द्विधा स्थिती जगासमोर आलेली आहे. तसेच इस्त्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आणलेला घटनादुरुस्तीचा कायदा हाणून पाडण्यासाठी इस्त्रायलमध्ये सुरु असलेले आंदोलन हे मोसाद या इस्त्रायली गुप्तचर संघटनेने पेटविल्याचा निष्कर्ष अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी काढल्याचे या गुप्त कागदपत्रांतून उघड झालेले आहे.
अमेरिकेच्या या गुप्त कागदपत्रांत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या विविध घटकांचा उल्लेख केलेला आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण दल प्रमुख अँगस कॅम्पबेल यांनी अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांची चालविलेली हेरगिरी दोन्ही देशांचे संबंध बिघडवण्यास कारणीभूत ठरणार असल्याचा इशारा दिला. मात्र दक्षिण कोरियाच्या प्रवक्त्यांनी गोपनीय कागदपत्रातील दक्षिण कोरिया संदर्भातला उल्लेख दिशाभूल करणारा असून शत्रू पक्षाने अशी बनवेगिरी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात गोपनीय माहिती आदान प्रदान करण्याचा करार झालेला असून अशाप्रकारची संवेदनशील माहिती कायमस्वरूपी मिळत असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले. मात्र विरोधी पक्षांनी दक्षिण कोरिया सरकारवर अमेरिकेला जाब विचारण्याची मागणी केलेली आहे.
जगभरातील देशांत हेरगिरी करण्याची अमेरिकेची जुनी सवय आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या या घाणेरड्या सवयीचा पर्दापाश 2013 साली एडवर्ड स्नोडेन यांनी केला होता. त्यावेळी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यावर अमेरिका पाळत ठेवत असल्याचे उघड झाले होते. जर्मनीचा शेजारी देश डेन्मार्कमार्फत ही सूत्रे हलविण्यात येत होते. तर गेल्यावर्षी अमेरिका युरोपियन युनियनमधील फ्रान्स व अन्य देशांची हेरगिरी करत असल्याचे जगजाहीर झाले होते. यात प्रामुख्याने 2006 ते 2012 पर्यंत तीन फ्रान्स राष्ट्राध्यक्षांची हेरगिरी चालविली होती. अमेरिकेच्या या हेरगिरीच्या जुन्या रोगावर त्याचे मित्र देश कोणती उपाययोजना करतायत हे पहावे लागेल.
प्रशांत कामत








