युक्रेन युद्धासंदर्भात राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भूमिका
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अद्यापही भडलेल्याच स्थितीत असताना, अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या युद्धात छुपेपणाने रशियाची बाजू घेणाऱया चीनला अमेरिकेने चांगलेच फटकारले असून भारताला साहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे. शस्त्रबळाच्या क्षेत्रात भारताचे रशियावर असणारे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताला सहाय्याचा हात अमेरिकेने पुढे केला आहे.
चीनने युक्रेन युद्धात रशियाला शस्त्रबळ किंवा साधनसामग्रीचे साहाय्य केल्यास चीनवर आर्थिक निर्बंध लादले जातील, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री वेंडी शेरमन यांनी ब्रुसेल्स येथे दिला आहे. या युद्धात रशियाला जो कटु अनुभव आला आहे, तोच चीनला आल्याखेरीज राहणार नाही. चीनने रशियाला साधनसामग्रीचे साहाय्य पुरविण्याआधी याचा दहा वेळा विचार करावा. रशियावर अमेरिकेने कठोर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचा अतिशय घातक परिणाम रशियावर होत असून रशियाची अर्थव्यवस्था आणि निर्यात थंडावली आहे. चीन हे सर्व पहात आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे त्याने अमेरिका किंवा युरोपियन देश यांच्या विरोधात जाण्याचे दुःसाहस करु नये. तसे केल्यास चीनला अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतील, अशा अर्थाचा इशारा त्यांनी दिला.
भारताला साहाय्याची तयारी
भारताची संरक्षण व्यवस्था रशियावर अवलंबून आहे, याची अमेरिकेला जाणीव आहे. भारताचे रशियावरचे अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी अमेरिका भारताला साहाय्य करण्यास तयार आहे. रशियावर निर्बंध असल्याने भारताला रशियाकडून होणाऱया शस्त्रपुरवठय़ात व्यत्यय येऊ शकतो. तो टाळण्यासाठी अमेरिका पुढे येऊ शकते. भारतासमोर चीनचेही आव्हान असल्याने त्याला शस्त्रसज्ज राहणे आवश्यक आहे. अमेरिकेने ही अडचण ओळखली आहे, असे शेरमन यांनी स्पष्ट केले.
चीनचे रशियाला पाठबळ
रशियाशी चीन सामरिक भागीदारी बळकट करणार आहे, असे विधान चीनने गेल्या आठवडय़ात केले होते. याची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. रशियाने युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे केले आहेत, असा आरोप होत असतानाही चीनने रशियाशी संबंध दृढ करण्याची भाषा केली आहे. तरीही चीनी कंपन्यांनी आतापर्यंत अमेरिकेच्या रशियावरील निर्बंधांना अनुकूल ठरेल अशी भूमिका घेतली आहे. तसेच रशियाला पुरविल्या जाणाऱया साधनांमध्ये अमेरिकेच्या नियमांच्या अनुसार परिवर्तनही केले आहे. तरीही, चीन रशियाला छुपे साहाय्य करु शकतो अशी अमेरिकेची भावना आहे. त्यानुसार चीनलाही इशारा देण्यात आला आहे.
भारताची भूमिका
युक्रेन आणि रशिया यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी आणि सर्व समस्यांवर तोडगा शांततेच्या मार्गाने काढावा अशी भूमिका भारताने या युद्धात प्रारंभापासून घेतली आहे. या संदर्भात भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत जेव्हा जेव्हा रशियाविरोधात प्रस्ताव मांडण्यात आले, तेव्हा मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहण्याचे धोरण अवलंबिले आहे. मात्र, रशिया आणि आता अमेरिका या दोन्ही देशांनी भारताची ही भूमिका आणि त्यामागची कारणे समजून घेतली आहेत, असे या दोन्ही देशांच्या वक्तव्यांवरुन दिसून येते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
भारताच्या विदेशनितीचे यश..
ड युक्रेन युद्धात अमेरिका किंवा रशियाला न दुखावण्याची भारताची नीती
ड ही नीती यशस्वी ठरताना दिसत असल्याची अनेक तज्ञांची प्रतिक्रिया
ड भारतही यापुढे अमेरिकेशी सामरिक भागीदारी अधिक बळकट करणार









