दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर झाली चर्चा
► वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि चीनमधील संबंध सुधारण्यासाठी ब्लिंकेन यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ब्लिंकेन यांनी सोमवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली आणि ब्लिंकेन आणि जिनपिंग यांच्यात अमेरिका-चीन संबंधांमधील तणाव दूर करण्याकरता चर्चा झाली आहे.
जो बिडेन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर ब्लिंकेन हे चीनचा दौरा करणारे पहिले उच्चस्तरीय अमेरिकन अधिकारी आहेत. तसेच मागील 5 वर्षांमध्ये बीजिंगचा दौरा करणारे ते अमेरिकेचे पहिले विदेशमंत्री आहेत.
बिडेन आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी मागील वर्षी बाली येथे झालेल्या एका बैठकीत लवकरच ब्लिंकेन यांच्या दौऱ्यासंबंधी सहमती झाली होती. ब्लिंकेन यांचा हा दौरा फेब्रुवारी महिन्यात होणार होता. परंतु अमेरिकेच्या हवाईक्षेत्रात चिनी स्पाय बलून आढळून आल्यावर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. चिनी स्पाय बलून अमेरिकेकडून लढाऊ विमानाचा वापर करत नष्ट करण्यात आला होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्लिंकेन यांचा चीन दौरा लांबणीवर पडला होता.









