जी-20 च्या बैठकीत होणार सामील
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन हे जी-20 च्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत सामील होण्यासाठी 1 मार्च रोजी भारत दौऱयावर असणार आहेत. भारत-अमेरिका भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी ते भारताच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करणार आहेत. भारत यंदा जी-20 समुहाचे अध्यक्षत्व करत आहे. जी-20 च्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत बहुपक्षवाद मजबूत करणे, अन्न तसेच ऊर्जा सुरक्षा, निरंतर विकासावरील सहकार्य वाढविण्याचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. या बैठकीदरम्यान लैंगिक समानता आणि महिला अधिकारांवरही चर्चा होणार असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले आहे.
ब्लिंकेन हे 3 दिवसीय दौऱयासाठी भारतात येत आहेत. तत्पूर्वी ते 28 फेब्रुवारी रोजी कजाकिस्तान आणि उझ्बेकिस्तानला भेट देणार आहेत. मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे जी-20 देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत समुहाच्या सदस्य देशांसोबत भारताकडून विशेष आमंत्रित अतिथी देश बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन अणि संयुक्त अरब अमिरातचे प्रतिनिधी देखील सामील होतील.









