मिसौरी येथील घटना ः हल्लेखोरही मारला गेला
वृत्तसंस्था/ मिसौरी
अमेरिकेत बंदूक वापरावर बंदी घालण्याची मागणी तीव्र असतानाच पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. मिसौरी येथील सेंट लुइस हायस्कूलमध्ये एका बंदुकधाऱयाने केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोर मारला गेला आहे. तर गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला तसेच एका किशोरवयीन मुलीचा समावेश आहे.
सेंट्रल व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स हायस्कुलमध्ये ही घटना घडली असून हल्लेखोराला पोलिसांनी शाळेतच कंठस्नान घातले आहे. या हल्ल्यात एकूण 9 जणांना गोळी लागली असल्याची माहिती पोलीस आयुक्त माइक सॅक यांनी दिली आहे.
हल्लेखोरासह 8 जणांना रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे संशयिताचा मृत्यू झाला. संशयित हल्लेखोराचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सॅक यांनी सांगितले आहे.









