वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इराणशी तेल व्यापार केल्याप्रकरणी अमेरिकेने चार भारतीय कंपन्यांवर निर्बंध घातला आहे. या कंपन्यांनी इराणच्या इंधन तेलाची वाहतून आपली नावे लपवून केली, असा आरोप आहे. इराणविरोधात अमेरिकेच्या ट्रंप प्रशासनाने ‘अधिकाधिक दबाव‘ योजना लागू केली असून या योजनेच्या अंतर्गत हे निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ भारतस्थित कंपन्याच नव्हे, तर अमेरिकेने अन्य अनेक देशांच्या एकंदर 30 मालवाहू नौका आणि व्यक्तींवर असे निर्बंध घातले आहेत.
नवी मुंबई स्थित फ्लक्स मेरिटाईम एलएलपी, दिल्लीस्थित बीएसएम मरीन एलएलपी, ऑस्टीनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि तंजावूर येथील कॉसमॉस लाईन्स कंपनी अशी या चार भारतस्थित कंपन्यांची नावे आहेत. यांपैकी 3 कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी अन्य कंपन्यांच्या तेलवाहू नौकांमधून इराणच्या तेलाची वाहतूक केली होती, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तर एका कंपनीवर इराणच्या तेलाची थेट वाहतूक केल्याचा आरोप अमेरिकेने ठेवला आहे.
इतर देशांच्या कंपन्याही…
मंगळवारी अमेरिकेने निर्बंध लागू केलेल्या कंपन्यांमध्ये इतर देशांच्या कंपन्यांचाही समावेश आहे. संयुक्त अरब अमिरात, चीन, इराण आणि अन्य काही देशांच्या नौका कंपन्यांवर असे निर्बंध घालण्यात आले आहेत. या कंपन्या इराणच्या तेलाची बेकायदा वाहतूक करतात. त्यामुळे इराणला आर्थिक लाभ होतो. या पैशाच्या जोरावर इराण फुटीरतावादी किंवा दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देऊ शकतो.
अस्थिरता निर्माण केल्याचा आरोप
इराण आपल्या पैशाच्या जोरावर जगात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपला अण्वस्त्र कार्यक्रम वेगाने पुढे नेण्याचा तो प्रयत्न करीत आहे. यामुळे जगासमोर सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. इराणवर अमेरिकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांचे कठोर पालन सर्व संबंधित देशांनी केले, तर इराणला पैशाची चणचण जाणवेल आणि तो आपले धोकादायक कार्यक्रम मागे घेईल अशी अमेरिकेची अटकळ आह, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली आहे.









