दहशतवाद विरोधात तयार करणार रोडमॅप : आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगात अत्यंत वेगाने दहशतवाद नवे रुप धारण करत आहे. तंत्रज्ञानाची मदत घेत हा दहशतवाद जगातील अनेक देशांसमोर आव्हान उभे करत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एडीएमएम-प्लस म्हणजेच आसियान देशाच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत नव्या रोडमॅपवर चर्चा होणार आहे. ही बैठक दिल्लीत 19 मार्च ते 20 मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे.
‘आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक-प्लस’च्या दहशतवादविरोधी एक्स्पर्ट वर्किंग ग्रूप (ईडब्ल्यूजी) ची 14 वी वार्षिक बैठक आहे. ही बैठक भारत आणि मलेशिया संयुक्तपणे आयोजित करत आहेत. या बैठकीत 10 आसियान देश ज्यात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, सिंगापूर आणि थायलंडचे प्रतिनिधी भाग घेतील.
अमेरिका-चीन-रशिया एकत्र येणार
आसियान देशांबरोबराच 8 अन्य डायलॉग पार्टनर देश या बैठकीचा हिस्सा असतील. ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, दक्षिण कोरिया, जपान, चीन, अमेरिका आणि रशियाचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारत पहिल्यांदाच दहशतवादविरोधी एक्सपर्ट वर्किंग ग्रूपचे सह-अध्यक्षत्व करत आहे. या बैठकीची सुरुवात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह 19 मार्च रोजी करतील. 2025-27 दरम्यान होणाऱ्या दहशतवादविरोधी बैठकांचे नियोजन केले जाणार आहे. दहशतवाद आणि उग्रवादाच्या वाढत्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी एक मजबूत आणि व्यापक रणनीति तयार करणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
7 क्षेत्रांमध्ये सहकार्य
एडीएमएम-प्लस हे व्यासपीठ भागीदार देशांच्या संरक्षण विभागांदरम्यान सहकार्याला चालना देते. सद्यकाळात 7 विविध क्षेत्रांवर भर देण्यात येत आहे, यात दहशतवादविरोधी मोहीम, सागरी सुरक्षा, एचएडीआर ऑपरेशन, पीसकिपिंग ऑपरेशन, मिलिट्री मेडिसीन, सायबर सुरक्षा आणि खाणींची सुरक्षा सामील आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एक्सपर्ट वर्किंग ग्रूपची स्थापना करण्यात आली आहे. ईडब्ल्यूजीचे सह-अध्यक्षत्व प्रत्येक आसियान सदस्य देश आणि एक डायलॉग पार्टनर देशाला दर तीन वर्षांच्या चक्राच्या आधारावर प्राप्त होते. भारत भागीदार देश असल्याने सह-आयोजनाची जबाबदारी मिळाली आहे. मागील वर्षी भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट लाओसमध्ये एडीएमएम-प्लसच्या बैठकीनंतर झाली होती.








