वैमानिकांच्या प्रशिक्षणानंतर नेदरलँड-डेन्मार्क करणार पुरवठा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने युक्रेनला एफ-16 लढाऊ विमाने देण्याची तयारी दर्शविली आहे. वैमानिकांच्या प्रशिक्षणानंतर नेदरलँड आणि डेन्मार्क युक्रेनला ही लढाऊ विमाने पुरविणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेन दीर्घकाळापासून रशियाविरोधी युद्धासाठी लढाऊ विमानांची मागणी करत आहे.
युक्रेनच्या मागणीनुसार 11 देशांच्या आघाडीने लढाऊ विमानांच्या उ•ाणासाठी युक्रेनियन वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हे प्रशिक्षण चालू महिन्यात सुरू होणार आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील असे उद्गार डेन्मार्कचे संरक्षणमंत्री ट्रोएल्स पॉलेसन यांनी काढले आहेत.
विदेशमंत्र्यांची लेखी सहमती
विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी पत्र लिहून नेदरलँड आणि डेन्मार्कला लढाऊ विमाने पुरविण्यासाठी मंजुरी दिली आहे. युक्रेनला एफ-16 लढाऊ विमानांचा पुरवठा आणि वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेचे पूर्ण समर्थन आहे. युक्रेनने कुठल्याही स्थितीत स्वत:चे रक्षण करावे हे सध्या सर्वात आवश्यक असल्याचे ब्लिंकेन यांनी पत्रात नमूद केले आहे. डेन्मार्कसोबत रोमानियातही युक्रेनियन वैमानिकांकरता प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. या लढाऊ विमानांचा वापर चालू वर्षात करणे शक्य होणार नसल्याची भीती युक्रेनने व्यक्त केली आहे.
सोव्हियतकाळातील विमानांचा वापर
एफ-16 फाल्कनला जगातील सर्वात विश्वासार्ह लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. अमेरिकेसोबत बेल्जियम आणि पाकिस्तान देखील या लढाऊ विमानांचा प्रामुख्याने वापर करते. युक्रेनला ही लढाऊ विमाने मिळाल्यास रशियाविरोधी युद्धात त्याला मोठा लाभ होणार आहे. युक्रेन सध्या सुमारे 30 वर्षे जुन्या सोव्हियत काळातील लढाऊ विमानांचा वापर करत आहे. ही जुनी लढाऊ विमाने युद्धात फारशी उपयुक्त ठरलेली नाहीत.









