वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंसकी यांच्यात व्हाइट हाउसमध्ये झालेल्या बैठकीत मोठा तणाव निर्माण झाला होता. ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी झेलेंस्की यांच्यावर रशियाच्या अटी मान्य करण्यासाठी दबाव टाकला. अटी मान्य न केल्यास रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे युक्रेनला नष्ट करतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यातील ही चर्चा तणावपूर्ण झाली, ज्यात ट्रम्प सातत्याने झेलेंस्की यांना उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. तर झेलेंस्की यांनी युद्ध थांबविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वक्तव्य सोमवारी केले.
ट्रम्प यांनी युक्रेनच्या शिष्टमंडळाकडून सादर करण्यात आलेल्या युद्धक्षेत्राच्या नकाशांना फेटाळले आहे. बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी झेलेंस्कींवर पूर्ण पूर्व डोनबास क्षेत्र रशियाला सोपविण्यासाठी दबाव टाकला. दोन्ही देशांनी युद्ध समाप्त करायला हवे आणि जेथे आहेत तेथेच थांबायला हवे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
युक्रेनला शस्त्रास्त्रs देण्यास नकार
रशियाच्या आक्रमणाच्या विरोधात लढण्यासाठी शस्त्रास्त्रांच्या शोधात झेलेंस्की हे व्हाइट हाउसमध्ये पोहोचले होते, युक्रेनला दीर्घ पल्ल्याच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांची मोठी आवश्यकता आहे. परंतु ट्रम्प यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरविण्यास कुठलीच रुची दाखविली नाही.









