ट्रम्प यांच्या प्रतिद्वंद्वी कराच्या घोषणेनंतर जयशंकर यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/लंडन
अमेरिका बहुध्रुवी रचनेकडे जात असून त्या देशाचे सध्याचे हे धोरण भारतासाठी अनुकूलतेचे आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ते लंडन येथे बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही प्रतिद्वंद्वी कर (रेसिप्रोकल टॅक्स) लागू करणार असल्याची घोषणा केल्यानंतरही जयशंकर यांनी केलेले हे विधान महत्वाच्या मानण्यात येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली होती. या भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापक द्विपक्षीय करार करण्यासंबंधी व्यापक चर्चा झाली होती. सध्याही भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या उच्च अधिकाऱ्यांशी व्यापार विषयक चर्चा करीत आहेत. या चर्चेचे फलित सकारात्मक असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अमेरिका ट्रम्प यांच्या नेतृत्वात बहुध्रुवी व्यवस्थेकडे चालली असून ही व्यवस्था भारतासाठी अनुकूल ठरु शकते, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
अमेरिकेशी व्यापक चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापक व्यापार चर्चा झाली आहे. 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचेल अशी शक्यता आहे. भारत अमेरिकेशी एक व्यापक व्यापारी करार करण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेचाही याला पाठिंबा आहे. कदाचित, 2025 च्या अखेरपर्यंत असा करार अस्तित्वात येईल. आम्ही या संदर्भात आशावादी असून दोन्ही देशांना लाभ होईल, अशी मांडणी जयशंकर यांनी केली.









