वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ओपन आजपासून सुरू होत असून गतविजेता जॅनिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ हे सलग तिसऱ्या ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवून आहेत, तर नोवाक जोकोविच 25 वा प्रमुख किताब मिळवून नवीन पिढीचे आव्हान मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. वर्षाच्या या शेवटच्या ग्रँड स्लॅममध्ये आकर्षक बाबींची कमतरता नाही. बेन शेल्टन, टेलर फ्रिट्झ आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह हे आपले पहिले प्रमुख विजेतेपद मिळविण्याच्या आकांक्षेने मैदानात उतरतील आणि जोकोविच मार्गारेट कोर्टला मागे टाकून सर्वकालीन विक्रम नोंदविण्याची आशा बाळगून असेल.
तथापि, सर्वांच्या नजरा सिनर आणि अल्काराझवर असतील. कारण सध्याच्या पिढीचे हे आघाडीचे खेळाडू असून जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावर नजर ठेवून ते मैदानात उतरतील. अल्काराझने मॅरेथॉन फ्रेंच ओपन फायनल जिंकून आपला मुकुट कायम राखला, तर सिनरने गेल्या महिन्यात विम्बल्डनमध्ये स्पॅनिश खेळाडूला नमवून बरोबरी साधली. जर ही जोडी येथेही अंतिम फेरीपर्यंत पोहोचली, तर न्यूयॉर्कमधील रंगतदार अंतिम लढतीचा मार्ग मोकळा होईल. ऑस्ट्रेलियन ओपन विजेता सिनर अलीकडच्या काळात हार्डकोर्टवर वर्चस्व गाजवत असला, तरी त्याने अशा कोर्टवरील अल्काराझसोबतच्या सात लढतींपैकी फक्त दोनच लढती जिंकल्या आहेत. जागतिक क्रमवारीत दुस्रया क्रमांकावर असलेल्या या खेळाडूविरुद्धची त्याची एकूण कामगिरी 5-9 अशी आहे.
चार वेळा विजेता राहिलेला सातवा मानांकित नोवाक जोकोविच लर्नर टिएनविऊद्ध सुऊवात करेल आणि चौथ्या फेरीत फ्रान्सिस टियाफो आणि क्वार्टरफायनलमध्ये चौथ्या मानांकित फ्रिट्झचा त्याला सामना करावा लागू शकतो. त्यानंतर अल्काराझविऊद्धचा त्याचा उपांत्य सामना रंगू शकतो. आजारातून बरा होत असलेल्या गतविजेत्या जॅनिक सिनरला कार्लोस अल्काराझपेक्षा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग अधिक अनुकूल आहे. सोमवारी कार्लोस अल्काराझविऊद्ध 5-0 ने पिछाडीवर पडल्यानंतर सिनसिनाटीच्या अंतिम फेरीतून माघार घेतल्याने अव्वल मानांकित सिनरच्या तब्येतीवर सर्वांचे लक्ष असेल. नंतर त्याने न्यूयॉर्कमधील मिश्र दुहेरी स्पर्धेतूनही माघार घेतली.
या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनमध्ये विजेतेपद मिळवून ग्रँड स्लॅम किताबांची संख्या चारवर नेणारा सिनर झेक रिपब्लिकचा खेळाडू विट कोप्रीवाविरुद्ध सुरुवात करेल आणि उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित जॅक ड्रॅपर, उपांत्य फेरीत तिसरा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेन आणि अंतिम फेरीत अल्काराझचा त्याला सामना करावा लागू शकतो. फ्रेंच ओपन चॅम्पियन अल्काराझ अमेरिकन रेली ओपेल्काविरुद्ध सुरुवात करेल आणि अंतिम फेरीपर्यंतच्या त्याच्या प्रवासात उपांत्यपूर्व फेरीत बेन शेल्टन आणि उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झशी त्याचा सामना होऊ शकतो.
महिलांच्या गटात अव्वल मानांकित सबालेंका रेबेका मासारोवाविऊद्ध सुऊवात करेल आणि सिनसिनाटीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या जास्मिन पाओलिनीसोबत तिची गाठ उपांत्यपूर्व फेरीत, तर जेसिका पेगुलासोबत उपांत्य फेरीत पडू शकते. सिनसिनाटीत स्पर्धा जिंकून दाखल झालेली विम्बल्डन विजेती इगा स्वायटेकला क्वार्टरफायनलमध्ये अमांडा अनिसिमोवाचा सामना करावा लागू शकतो. फ्रेंच ओपन विजेत्या तिसऱ्या मानांकित कोको गॉफची स्वायटेकशी गाठ पडू शकते. पण त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित आणि या वर्षीची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या अमेरिकन मॅडिसन कीजचा तिला सामना करावा लागू शकतो.
आरिना सबालेंका यूएस ओपनमध्ये विद्यमान विजेती आणि विजेतेपदाची भक्कम दावेदार म्हणून मैदानात उतरेल. परंतु तिचा 2025 चा हंगाम सुरळीत गेलेला नाही. जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाची ही खेळाडू वर्षाच्या पहिल्या दोन ग्रँड स्लॅममध्ये अंतिम अडथळा पार करू शकली नाही, तर विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मॅडिसन कीजकडून झालेल्या पराभवाने तिची वर्षाची सुरुवात झाली, त्यानंतर रोलँड गॅरोवर कोको गॉफसमोर नमते घ्यावे लागून पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.









