वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
येत्या ऑक्टोबरमध्ये येथे होणारी अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्याचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) मंगळवारी जाहीर केले.
4 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा नियोजित होती. कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थ असल्याचे अमेरिकन बॅडमिंटनने सांगितल्यानंतर बीडब्ल्यूएफला हा निर्णय जाहीर करावा लागला. यूएस ओपन ही बीडब्ल्यूएफ टूरवरील सुपर 300 स्पर्धा असून इंडेनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेने या टूरची जकार्तामध्ये सुरुवात झाली आहे. सलग तिसऱया वर्षी यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आली असून 2019 मध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत लिन चुन यीने पुरुष एकेरीचे तर वांग झियीने महिला एकेरीचे जेतेपद मिळविले होते. त्यावेळी ही स्पर्धा कॅलिफोर्नियात आयोजित करण्यात आली होती.
या वर्षीच्या मोसमात एकूण 30 बॅडमिंटन स्पर्धा होणार असून त्यात जुलै-ऑगस्टमध्ये होणारी राष्ट्रकुल स्पर्धा, सप्टेंबरमध्ये चीनमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा या महत्त्वाचा स्पर्धांचा समावेश आहे. अमेरिकन स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंना या मोसमातील उर्वरित स्पर्धांत मानांकन गुण मिळवून वर्ल्ड टूर फायनलसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. वर्षातील ही अखेरची स्पर्धा चीनमधील गुआंगझोयू येथे 14 डिसेंबरपासून होणार आहे.









