
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
येथे सुरु असलेल्या अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल खेळाडू पीव्ही सिंधू व कॅनडा ओपन विजेता लक्ष्य सेनने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तसेच युवा बॅडमिंटनपटू एस. शंकर सुब्रमण्यमने शानदार प्रारंभ करताना विजयी सलामी दिली. अनुभवी बीसाई प्रणितला मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मागील काही स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागलेल्या सिंधूने गुरुवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत आश्वासक सुरुवात केली. सलामीच्या लढतीत सिंधूने अमेरिकेच्या दीक्षा गुप्ताचा 21-15, 21-10 असा पराभव केला. 27 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी दीक्षाला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत तैवानच्या जागतिक क्रमवारीत 30 व्या स्थानी असलेल्या शाओ युन सुंगशी होईल. याशिवाय, महिला एकेरीच्या अन्य एका लढतीत ऋत्विका ग•sला पहिल्याच सामन्यात हार पत्कारावी लागली. तिला चिनी तैपेईच्या लिन हेसेंगने 21-14, 21-11 असे नमवले.
लक्ष्य सेनची विजयी सलामी
गुरुवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनने शानदार विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. लक्ष्यने फिनलँडच्या कोलजोनेनचा 21-8, 21-16 असा पराभव केला. ही लढत 30 मिनिटे चालली. मागील आठवड्यात कॅनडा ओपन जिंकणाऱ्या लक्ष्यने सलामीच्या सामन्यात जबरदस्त खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, त्याची पुढील फेरीत लढत झेक प्रजासत्ताकच्या जॅन लाऊदाशी होईल. अन्य एका लढतीत युवा एस. सुब्रमण्यमने आयर्लंडच्या नहाट एनगुएनचा 21-11, 21-16 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर इस्त्रायलच्या मिशा झिब्रेमनचे आव्हान असेल.याशिवाय, भारताचा बी साई प्रणितला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला चीनचा दिग्गज खेळाडू व सातव्या मानांकित शी फेंगने 74 मिनिटे चाललेल्या सामन्यात 16-21,21-14, 21-19 असे पराभूत केले. पारुपल्ली कश्यपाला मात्र आपल्या दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.









