सोलोमन बेटामध्ये ड्रगनचा हस्तक्षेप
वृत्तसंस्था/ सिडनी
अमेरिका आता अणुबॉम्ब पाडविण्याची क्षमता असणाऱया बी-52 बॉम्बर्सना ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातील वायुतळावर तैनात करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टिंडाल वायुतळावर 6 न्युक्लियर बॉम्बर अमेरिकेकडून तैनात करण्यात येणार असल्याने चीनची चिंता वाढणार आहे.
सोलोमेन बेटावर चीन सैन्यतळ निर्माण करत असल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. आशिया आणि विशेषकरून प्रशांत महासागरात चीन वेगाने स्वतःचे सैन्यबळ वाढवत आहे. याचमुळे चीनने सोलोमन बेटावर नौदल तळ स्थापन करून ऑस्ट्रेलियानजीक सैन्य तैनात करण्याची तयारी करत आहे.
सोलोमन बेट ऑस्ट्रेलियापासून खूपच नजीक आहे. याचमुळे अमेरिका आता ऑस्ट्रेलियात सैन्य तैनात करू पाहत आहे. टिंडाल वायुतळावर बी-52 बॉम्बर्स उतरविण्याची आणि त्यांना तेथे तैनात करण्यासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
चीनसोबतचा वाढता तणाव पाहता अमेरिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग महत्त्वाचा ठरला आहे. तैवानवर चिनी हल्ल्याचा धोका पाहता अमेरिकेने बी-52 बॉम्बर्स तैनात करण्याचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हिंद-प्रशांत भागासाठी अमेरिका, ब्रिटन, आणि ऑस्ट्रेलियाची सुरक्षा भागीदारी ‘ऑकस’मुळे चीनच्या चिंता वाढल्या होत्या. 2021 मध्ये ‘ऑकस’ ही आघाडी हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या आक्रमकतेला नियंत्रित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती. याच्याच अंतर्गत अमेरिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आण्विक पाणबुडीसंबंधी करार झाला होता.
एप्रिल 2022 मध्ये सोलोमन बेट आणि चीनदरम्यान सुरक्षा करार झाला होता. यामुळे अमेरिका तसेच ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. सोलोमन बेटासोबतच्या करारामुळे चीनला लाभ होणार असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे होते. चीनने तेथे नौदल तळ निर्माण करण्यास सुरुवात केल्यावर ही भीती खरी ठरली होती.









