वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेने जपानशी व्यापार करार केला आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या कराराच्या अंतर्गत जपान अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्स (जवळपास 47 लाख कोटी रुपये) इतकी गुंतवणूक करणार आहे. तर अमेरिका जपानहून अमेरिकेत येणाऱ्या मालावर 15 टक्के कर लागू करणार आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी जपानवर 25 टक्के आयात कर लागू करण्याची घोषणा केली होती. आता हे कराचे प्रमाण 15 टक्क्यांवर आणण्यात आले आहे.
जपानने अमेरिकेच्या मालासाठी आपली बाजारपेठ मोकळी करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे अमेरिकेत बनविण्यात आलेल्या कार्स, ट्रक्स, तांदूळ आणि काही कृषी उत्पादने जपान आयात करणार आहे. हा इतिहासातील सर्वात मोठा व्यापारी करार आहे, अशी भलावण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे.
जपानचे प्रतिनिधीमंडळ दौऱ्यावर
हा करार करण्यासाठी जपानच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीमंडळ नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहे. या मंडळाशी अमेरिकेने यशस्वीरित्या बोलणी केली असून त्यानंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारामुळे व्यापाराच्या संदर्भात दोन्ही देशांमधील संभाव्य संघर्ष टाळला गेला आहे, अशी प्रतिक्रिया काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. जपानने अमेरिकेचा कर 10 टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळविले असून ही तडजोड जपानसाठी प्राप्त परिस्थितीत लाभदायक असल्याचे प्रतिपादन जपानचे नेते शिगेरु इशिबा यांनी पेले.
जपानच्या शेअरबाजारात वधार
या कराराच्या घोषणेनंतर जपानच्या शेअरबाजाराचा निर्देशांक निक्कीमध्ये 3 टक्क्यांचा वधार पहावयास मिळाला आहे. जपानच्या कार कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वधारल्याचे दिसून येत आहे. जपानची अमेरिकेला होणारी कार निर्यात या करव्यवस्थेमुळे बऱ्याच प्रमाणात वाचली असल्याने जपानच्या कार उद्योगात समाधानाचे वातावरण आहे. हा करार उभयपक्षी लाभाचा असल्याचे मत अमेरिका आणि जपान या दोन्ही देशांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.








