गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्याबाबत आयोजित परिषदेत सहभागी होणार : अजित डोवाल अध्यक्षस्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात आयोजित करण्यात आलेल्या गुप्तचर परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख/संचालक तुलसी गब्बार्ड भारतात दाखल झाल्या आहेत. त्या इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या दौऱ्यावरून थेट दिल्लीत पोहोचल्या असून नवीन अमेरिकन प्रशासनातर्फे भारताला भेट देणाऱ्या त्या पहिल्याच उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्यासोबत जागतिक गुप्तचर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेमध्ये दहशतवाद आणि गुप्तचर माहिती सामायिकरण यंत्रणा मजबूत करण्यावर चर्चा केली जाईल. तसेच रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील संघर्षाच्या प्रभावासह जागतिक आव्हानांवर गुप्तचर प्रमुख चर्चा करणार आहेत. टेरर फंडिंगसोबत डिजिटल जगतातील गुन्हे रोखण्याच्या पद्धतींवरही चर्चा होऊ शकते. सोमवारपयर्यंत दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अनेक देशांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुखही सहभागी होतील.
रशिया-युक्रेन युद्ध आणि पाकिस्तानमधील अस्थिरतेदरम्यान दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी जगाला जागृत ठेवले आहे. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन ‘टॅरिफ वॉर’ सुरू करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे महत्त्व चांगलेच माहिती आहे. यामुळेच ट्रम्प सरकारचे विशेष दूत आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख तुलसी गब्बार्ड यांना भारतात पाठवण्यात आले आहे. गब्बार्ड यांच्या या दौऱ्यात द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्यांवर सहकार्य अधिक मजबूत पद्धतीने पुढे नेण्याचाही अमेरिकेचा विचार आहे.
तुलसी गब्बार्ड यांच्या भारत भेटीची वेळ खूप महत्त्वाची आहे. रशिया आणि युक्रेनमधील शांततेच्या चर्चा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. दुसरीकडे, हमास आणि इतर संघटना पश्चिम आशियात दहशत माजवत आहेत. आता पाकिस्तानमधील परिस्थितीही सतत बिकट होत चालली आहे. बलुचिस्तानमधील लोकांनी आता पाकिस्तानी सरकार आणि लष्कराच्या दडपशाहीविरोधात जोरदार आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान आता भारताची राजधानी नवी दिल्लीत जगातील प्रख्यात अन् कुख्यात गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख एकत्र येणार आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, न्युझीलंडसोबत भारताचे मित्र असलेल्या काही देशांचे गुप्तचर प्रमुख एका बैठकीत सामील होणार आहेत. सुमारे 20 हून अधिक देशांचे गुप्तचर अन् सुरक्षा अधिकारी या मोठ्या परिषदेत सामील होतील. या परिषदेचे अध्यक्षत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करणार आहेत. गुप्तचर माहितींच्या आदान-प्रदानात उत्तम समन्वय, टेरर फंडिंग आणि डिजिटल क्राइम यासारख्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या आधुनिक पद्धतींवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
गब्बार्ड- डोवाल यांच्यात उच्चस्तरीय चर्चा
गब्बार्ड या गुप्तचर प्रमुखांच्या परिषदेत भाग घेतील तसेच रायसीना डायलॉगमध्ये त्या सहभागी होण्याची शक्यता आहे. अजित डोवाल यांच्यासोबत त्यांची स्वतंत्र द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या गुप्तचर प्रमुखांसोबत देखील डोवाल हे स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.









