1 ऑगस्टपासून अंमबजावणी : दंड आकारण्याचीही डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून अमेरिका करीत असलेल्या आयातीवर 25 टक्के व्यापार शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे, तर भारताला रशियाकडून कच्चे इंधन तेल आणि शस्त्रसामग्री आयात केल्यामुळे दंडही द्यावा लागणार आहे. या दंडाचे प्रमाण किती असेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. हा कर आणि दंड 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतरच भारत आपली प्रतिक्रिया व्यक्त करेल, असे भारताच्या वाणिज्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताशी होऊ घातलेल्या व्यापार कराराला अद्याप अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. त्यामुळे भारताला 1 ऑगस्टपासून कर आणि दंडही द्यावा लागेल, असे वक्तव्य ट्रम्प यांनी तीन दिवसांपूर्वी एका पत्रकाराला मुलाखत देताना केले होते. त्यानुसार त्यांनी बुधवारी संध्याकाळी या कर आणि दंडाची घोषणा केली आहे.
भारत आमचा मित्र, पण…
भारत हा आमचा मित्रदेश आहे. तथापि, तो आमच्या मालावर अधिक प्रमाणात कर आकारणी करत आहे. यामुळे अमेरिकेची आर्थिक हानी होत आहे. परिणामी, भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर 1 ऑगस्टपासून हा कर लागू करण्यात येत आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे इंधन तेल आणि शस्त्रास्त्रे आयात करीत आहे. परिणामी, रशियाला उत्पन्न मिळत असून त्याच्या आधारावर रशिया युक्रेनमध्ये हिंसाचार करीत आहे. भारताप्रमाणे चीनही रशियाकडून तेल खरेदी करतो. यामुळे रशियाचे बळ वाढते. यासाठी भारतावर 25 टक्के करासह अतिरिक्त कर किंवा दंडही आकारण्यात येईल, असे ट्रम्प यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या या धोरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होणार, याची चर्चा आता राजकीय आणि आर्थिक वर्तुळात होत आहे.
व्यापार कराराचे काय…
भारत आणि अमेरिका यांच्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून व्यापार कराराविषयी चर्चा केली जात आहे. या चर्चेच्या 6 फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. तथापि, तोडगा निघालेला नाही. चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ट्रम्प यांनी त्यांची कर लागू करण्याची योजना तीन महिने पुढे ढकलली होती. तो कालावधी 31 जुलैला संपत आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून कर लागू होईल. तथापि, व्यापार कराराविषयीची चर्चा होतच राहील. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळ भारतात पुढील चर्चा करण्यासाठी येत आहे.
1 टक्का कमी
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी फेब्रुवारीत जगातील 200 हून अधिक देशांवर वाढीव कर लागू करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी भारतावर 26 टक्के कर लागू करण्यात आला होता. तथापि, आता हा कर 1 टक्का कमी करण्यात आला असून तो 25 टक्के असेल, असे स्पष्ट करण्यात आले. या संबंधी भारताने आपली अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया अद्याप घोषित पेलेली नाही.
भारताचे म्हणणे काय आहे…
अध्यक्ष ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क घोषणेचा सूक्ष्म अभ्यास करूनच त्यासंबंधी भारत आपली भूमिका निर्धारित करणार आहे, असे भारताच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 25 टक्के कराचा विशेष परिणाम होणार नाही. कारण जवळपास तितका कर आजही लागू आहे. रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी करत असल्यामुळे जो ‘दंड’ लावण्यात येत आहे, त्याचा अधिक विचार करावा लागणार आहे. त्यामुळे घाईगडबडीने प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार नाही, अशीही माहिती अर्थ विभाग आणि वाणिज्य विभाग अधिकाऱ्यांनी दिली.
भारतावर काय परिणाम…
भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्स, वाहनांचे सुटे भाग, पैलू पाडलेले हिरे, तयार कपडे आणि औषधे यांची निर्यात करतो. या वस्तूंवर अमेरिकेत आता वाढीव कर लागू केला जाणार आहे. त्यामुळे भारतात उत्पादित वस्तू अमेरिकेत महाग होतील. अमेरिकेत जितकी औषधे खपतात, त्यांच्या 40 टक्के औषधे भारतातून निर्यात होतात. ती आता अमेरिकेत महाग होतील. भारत अमेरिकेला 2.2 अब्ज डॉलर्सचे वाहनांचे सुटे भाग निर्यात करतो. तेही आता अमेरिकेत महाग होतील, असे मत अमेरिकेतील काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
वाढीव कर आणि परिणाम…
वाढीव करांचा भारतीय उत्पादकांवर त्वरित परिणाम होणे अशक्य
भारतीय वस्तू अमेरिकेत होणार महाग, औषधांच्या किमती वाढणार
औषधे, वाहनांचे सुटे भाग, हिरे, आभूषणे, वस्त्रप्रावरणे प्रमुख वस्तू
रशियाकडून कच्चे तेल व शस्त्रसामुग्री आयातीमुळे दंड द्यावा लागणार









