व्यापारयुद्ध पुन्हा भडकले, चीनकडूनही हालचाली
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा आणखी भडका उडाला असून आता अमेरिकेने चीनवरील व्यापार शुल्कात आणखी 100 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे अमेरिकेचा चीनवरचा कर 245 टक्के इतका झाला आहे. चीनमधून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर हा कर लागू करण्यात आला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला सर्व देशांवर प्रतिद्वंद्वी कर लागू केला होता. त्यांनी चीनवर त्यावेळी एकंदर 54 टक्के कर लावला होता. तथापि, चीननेही अमेरिकेवर आणखी कर लागू केल्याने अमेरिकेने पुन्हा करात वाढ केली. अशाप्रकारे गेल्या दोन आठवड्यांमध्ये हा कर वाढत जाऊन आता तो 245 टक्के झाला आहे. चीननेही अमेरिकेवर 184 टक्के कर लागू केला आहे.
व्यापार थंडावणार
या करयुद्धामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारावर विपरीत परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक व्यापारावरही याचा परिणाम होणार आहे. अमेरिकेतील तज्ञांच्या मते अमेरिका आणि चीन यांच्यातील या व्यापार संघर्षामुळे जागतिक व्यापारात या वर्षी 1.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. याचा फटका छोट्या देशांनाही मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.
चीनचा अमेरिकेवर आरोप
चीनने व्यापार करासंबंधी आपल्या भूमिकेत कोणतेही परिवर्तन केलेले नाही. मात्र, अमेरिकेने चीनला आव्हान दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्यापार युद्धाचा प्रारंभ अमेरिकेनेच केलेला असून यासाठी चीनला उत्तरदायी ठरविले जाऊ नये, असे प्रतिपादन चीनच्या विदेश व्यवहार प्रवक्त्याने बुधवारी केले.
अमेरिकेची करार करण्याची इच्छा
अजूनही आम्ही चीनसंबंधी आशावादी आहोत. चीन आमच्याशी करार करण्यास तयार होईल, असे आम्हाला वाटते. आम्ही चीनशी व्यापार करार करण्यास उत्सुक आहोत. मात्र, चीनकडूनच अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार करार व्हायचा असेल, तर चीननेच प्रथम पाऊल उचलावयास हवे, अशी अमेरिकेची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन व्हाईट हाऊसकडून करण्यात आले.









