महत्वपूर्ण करार, पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत
ऐतिहासिक दिवस
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्यात सविस्तर चर्चा
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना अध्यक्ष बायडेन आणि जिल यांच्याकडून शाही भोजन
- अमेरिकेशी भारताचे अनेक विषयांवर महत्वपूर्ण तंत्रवैज्ञानिक सामंजस्य करार
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन डीसी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्यात भारताच्या दृष्टीने महत्वाचे असे प्रथम फलित निष्पन्न झाले आहे. भारताच्या ‘तेजस’ या युद्ध विमानाची इंजिने अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतात निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या विश्वविख्यात कंपनीशी भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास प्राधिकरण’ (डीआरडीओ) या कंपनीने हा करार केला आहे. या इंजिनाचे तंत्रज्ञानही नंतरच्या काळात भारताकडे हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्येही सहकार्य आणि तंत्रज्ञान विकास संयुक्तरितीने करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष बायडेन यांनी गुरुवारी चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासंबंधीही चर्चा करण्यात आली. संरक्षण सामग्रीप्रमाणेच जैवतंत्रज्ञान, अवकाश संशोधन आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एकत्रितरित्या विकास साधण्याचाही निर्णय घेण्यात आला, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांनी पत्रकारांच्या प्रत्येकी दोन प्रश्नांना उत्तरे दिली. भारतातील मानवअधिकारांच्या स्थितीसंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. भारतात लोकशाही भक्कम असून कोणीही यासंबंधी शंका घेण्याचे कारण नाही. सरकार, कोणताही भेदभाव न करता ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या तत्वावर कार्य करीत आहे, असे उत्तर पंतप्रधान मोदींनी दिले.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्यांनी अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. तसेच दोन्ही देशांमध्ये अनेक करारांची पार्श्वभूमी तयार करण्यात आली. या करारांमध्ये भारतीय तंत्रज्ञांना अमेरिकेत काम करण्याचा व्हिसा देण्याची प्रक्रिया सुलभ करणे, तसेच भारताला अत्याधुनिक ड्रोन्स पुरविणे अशा अनेक करारांचा समावेश आहे. यापैकी ड्रोनचा करार हा भारतासाठी विशेष महत्वाचा असून त्यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील हालचालींवर भारत एकाचवेळी लक्ष ठेवू शकणार आहे. ही ड्रोन्स शत्रूच्या स्थानांवर अस्त्रांचा अचूक मर्माघात करण्यासाठीही सक्षम असल्याने देखरेख आणि हल्ला अशा दोन्ही उद्देशांसाठी ते उपयोगी असल्याचे तज्ञांचे मत आहे. व्हिसा नूतनीकरण प्रक्रिया सुलभ करावी मागणी होती. तीही पूर्ण झाली आहे.
वाणिज्य दुतावास उघडणार
अमेरिका भारतात बेंगळूर आणि अहमदाबाद या दोन महत्वाच्या शहरांमध्ये आपले वाणिज्य दुतावास स्थापन करणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन, तसेच वेग मिळणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भारतात अमेरिकेच्या अनेक कंपन्या मोठी गुंतवणूक करण्याशी शक्यता असून या गुंतवणुकीची पायाभरणी या दौऱ्यात केली गेली आहे.
5-जी तंत्रज्ञानात भागिदारी
दूरसंचार क्षेत्रात भारताशी जवळीक साधण्याची अमेरिकेची तीव्र इच्छा असून भारताच्या उत्कट प्रतिसादाची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे एका उच्चपदस्थ अमेरिकन अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विशेषत: 5-जी आणि त्याच्याही पुढच्या दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासात भारताशी भागिदारी करण्यास अमेरिका उत्सुक आहे. यासंबंधी लवकरच करार होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.
तंत्रज्ञान हस्तांतरण
भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या तंत्रज्ञानाचे अमेरिकडून हस्तांतरण करण्याच्या करारांसंबंधीही चर्चा करण्यात आली. नजीकच्या भविष्यकाळात याचे प्रत्यंतर येणार असल्याची माहिती देण्यात आली. गुरुवारीच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये सविस्तर चर्चा झाली. विविध आर्थिक आणि धोरणात्मक, तसेच सामरिक मुद्द्यांवर व्यापक व काटेकोर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा सर्व वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला नसला, तरी भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा पाया रचला गेला, असे दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.
अवकाश संशोधन सहकार्य
भारत आणि अमेरिका यांच्यात अवकाश संशोधन सहकार्याचा मार्ग प्रशस्त करण्यात आला आहे. भारत अमेरिकेच्या चांद्रयान आणि इतर अवकाश अभियानात सहभागी होणार आहे. दोन्ही देश एकमेकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ एकमेकांना मिळेल अशी व्यवस्था करणार आहेत. ही देखील या दौऱ्याची महत्वाची फलनिष्पत्ती मानली जात आहे. भारताच्या इस्रो या संस्थेला याचा मोठा लाभ होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारण संध्याकाळी साडेसात वाजता (अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता) आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन आणि त्यांच्या पत्नी (फर्स्ट लेडी) जिल सज्ज होते. पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यानंतर त्यांना ‘गन सॅल्यूट’ देण्यात आला. अत्यंत कमी राष्ट्रप्रमुखांना हा मान व्हाईट हाऊसमध्ये आजवर देण्यात आलेला आहे. गन सॅल्यूट देण्यात आलेले ते भारताचे दुसरे नेते ठरले आहेत. 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही हा मान मिळाला होता.
दोन्ही नेत्यांची वक्तव्ये
व्हाईट हाऊसमध्ये अध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचा औपचारिक परिचय आपल्या मंत्रिमंडळाला करुन दिला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी व्यक्तव्ये करुन आपल्या देशांच्या भूमिका स्पष्ट केल्या. आजच्या काळात दोन्ही लोकशाहीवादी देशांनी एकमेकांच्या जवळ येण्याची आवश्यकता असून त्यांच्यात उत्कट तांत्रिक, आर्थिक आणि सामरिक तसेच धोरणात्मक अशा स्वरुपाची भागिदारी दृढ होणे आवश्यक आहे, अशी मांडणी दोन्ही नेत्यांनी केली. त्यांच्या वक्तव्यांवर अनेक तज्ञांनी आणि अभ्यासकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एक तासभर चाललेल्या या कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शिखर परिषदेला प्रारंभ झाला. त्यांच्यातील चर्चा रात्री उशीरापर्यंत होत राहिली.
वैशिष्ट्यापूर्ण भेटवस्तूंचे हस्तांतरण
गुरुवारी भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात आलेल्या वैशिष्ट्यापूर्ण भेटवस्तू दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष बायडेन यांना चंदनाची सुबक पेटी आणि तिच्यासह भारताच्या संस्कृतीचा मौलिक ठेवा असलेला उपनिषदांचा संग्रह भेट दिला. यासह श्रीगजानाची मूर्ती, पूजासाहित्य आदी भेट दिली. या पेटीचे चंदन म्हैसूरमधील असून ती राजस्थानच्या कारागिरांनी निर्माण केली आहे. तिच्यावर ‘दृष्टसहस्रचंद्रो’ असे संस्कृत वचन आहे. जिल यांना त्यांनी 7.5 कॅरेटचा एक प्रयोगशाळानिर्मित हिरा भेट दिला. तसेच पंजाबमधील शुद्ध साजूक तुपाची कुपीही भेट दिली. जोसेफ बायडेन आणि जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना हस्तनिर्मित 100 वर्षांपूर्वीची ‘बुक गॅली’ भेट म्हणून दिली. याशिवाय प्रसिद्ध कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा प्रथम काव्यसंग्रहाच्या प्रथम आवृत्तीची प्रत आणि अमेरिकन प्राचीन कॅमेराही त्यांनी पंतप्रधान भेट दिला.









