वृत्तसंस्था /दमास्कस
सीरियात रशियाच्या 3 लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या 3 एमक्यू-9 ड्रोन्सला इंटरसेप्ट केले आहे. रशियाच्या सुखोई-35 लढाऊ विमानांनी ड्रोन्ससमोर पॅराशूटमधून शेल्स डागण्यास सुरुवात केल्याने ड्रोनचा फ्रंट ह्यू ब्लॉक होऊ लागला. यामुळे या ड्रोनला स्वत:चा मार्ग बदलावा लागला आहे. हे ड्रोन्स सीरियातील इस्लामिक स्टेटच्या तळांवर नजर ठेवून होते, असे अमेरिकेच्या वायुदलाकडून सांगण्यात आले. रशियाचे हे कृत्य बेजबाबदार आणि असुरक्षित असल्याचे अमेरिकेच्या वायुदलाचे लेफ्टनंटर जनरल एलेक्स ग्रिनकेविच यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या घटनेचा एक व्हिडिओही जारी केला आहे. हा व्हिडिओ ड्रोनकडून चित्रित करण्यात आला आहे. रशियन लढाऊ विमाने अमेरिकेच्या एमक्यू-9 ड्रोन्सच्या नजीकहून उ•ाण करत असल्याचे यात दिसून येते. घटनेदरम्यान रशियाच्या एका लढाऊ विमानाने ड्रोनसमोर येत स्वत:चा आफ्टरबर्नर अॅक्टिव्हेट केल्याने त्याचा वेग आणि प्रेशर वाढल्याचे आणि यामुळे ड्रोन ऑपरेट करणे अवघड ठरल्याचे दिसून येते. सीरियात रशियाकडून अशाप्रकारचा बेजबाबदारपणा रोखण्यात यावा, असे आम्ही आवाहन करतो. भविष्यात रशियाचे वायुदल इस्लामिक स्टेटला पराभूत करण्याच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय मापदंडांचे पालन करेल, अशी अपेक्षा करतो असे उद्गार जनरल ग्रिनकेविच यांनी काढले आहेत.
सीरियात अमेरिकेचे सैन्य तैनात
सीरियात अमेरिका आणि रशिया या दोघांच्या सैन्याकडून मोहीम राबविण्यात येतेय. अमेरिकेचे सुमारे 900 सैनिक सीरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात लढत आहेत. कुर्द नेतृत्वाखालील सीरियन डेमोक्रेटिक फोर्सला अमेरिकेच्या सैन्याकडून मदत करण्यात येत आहे. तर रशियाचे सैन्य सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या समर्थनार्थ तेथे तळ ठोकून आहे.









