इराणच्या हल्ल्यापासून इस्रायलला वाचविण्याची तयारी : सर्वात घातक लढाऊ विमान
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने स्वत:ची एफ-22 स्टील्थ लढाऊ विमाने पश्चिम आशियात पाठविली आहेत. अत्याधुनिक अमेरिकन एफ-22 स्टील्थ लढाऊ विमाने पश्चिम आशियात दाखल झाली असल्याचे अमेरिकेच्या सैन्याकडून सांगण्यात आले. इस्रायलवर इराणकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. इराणच्या संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका सातत्याने या क्षेत्रात स्वत:ची सैन्यक्षमता वाढवत आहे.
युएस सेंट्रल कमांडने पश्चिम आशियात किती एफ-22 स्टील्थ विमाने तैनात करण्यात आली याची संख्या देणे टाळले आहे. तसेच ही विमाने नेमकी कुठे तैनात करण्यात आली हे जाहीर करण्यासही नकार देण्यात आला आहे. इराण आणि त्याच्या प्रभावाखालील दहशतवादी संघटनांकडून क्षेत्रात कुठल्याही प्रकारच्या संघर्षाची शक्यता कमी करण्यासाठी ही विमाने तैनात करण्यात आल्याचे युएस सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आले आहे.
एफ-22 हे सद्यकाळातील जगातील सर्वात प्रभावी लढाऊ विमान मानले जाते. अमेरिकेच्या वायुदलाच्या ताफ्यातील हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे. यात अवलोकनीय तंत्रज्ञान, आधुनिक एव्हियोनिक्स आणि कार्यकुल इंजिन्सचा वापर करण्यात आला आहे. एफ-22 हे जगातील अन्य कुठल्याही सैन्य विमानाच्या तुलनेत बेजोड लढाऊ विमान मानण्यात येते.
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावादरम्यान संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी क्षेत्रात अतिरिक्त युद्धनौका आणि एक लढाऊ स्क्वाड्रन तैनात करण्याचा आदेश दिला आहे. इराण आणि त्याचे सहकारी हे हमास आणि हिजबुल्लाहच्या वरिष्ठ कमांडर्सच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इस्रायलवर हल्ले सुरू करतील असा संशय आहे. याचमुळे अमेरिकेने इस्रायलच्या मदतीसाठी मध्यपूर्वेत स्वत:च्या सैन्याची उपस्थिती वाढविली आहे.









