ट्रंप यांच्या करधोरणावर काँग्रेस खासदाराची टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. तसेच या तेलाचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात विकून मोठ्या प्रमाणात लाभ कमवत आहे. त्यामुळे भारतावर येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कर लावण्यात येतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नुकताच दिला आहे. अमेरिकेने अशा प्रकारे करवाढ केल्यास याचा त्रास भारताला नाही, तर अमेरिकेच्याच नागरीकांना होणार आहे. कारण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दरवाढ होणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी मंगळवारी केले आहे
एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी हे विचार व्यकत केले. ट्रंप यांच्या व्यापार शुल्क धोरणाचा विपरीत परिणाम अमेरिकेच्याच अर्थव्यवस्थेवर अधिक होण्याची शक्यता आहे. भारतावर याचा काही प्रमाणात परिणाम होईल. तथापि, या करांचा अंतिम बोजा अमेरिकेच्या ग्राहकांवरच पडणार आहे. ज्यावेळी अमेरिकाची जनता वाढत्या महागाईसंबंधी तक्रार करु लागेल, त्यावेळी अमेरिकेच्या प्रशासनाला आपल्या धोरणाच्या विपरीत परिणामांची जाणीव होईल. त्यामुळे या धोरणावर त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा, अशी प्रतिक्रिया कार्ती चिदंबरम यांनी व्यक्त केली.
त्वरित परिवर्तन अशक्य
भारताकडून अमेरिकेत पाठविल्या जाणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात अमेरिकेने कर लागू केल्यास या वस्तूंवर अवलंबून असणारे अमेरिकेतील अनेक उद्योग आणि छोटे व्यवसाय बंद होतील. कारण, भारतासारख्या मोठ्या देशाच्या पुरवठा साखळ्या त्वरित बंद करणे हे सोपे काम नाही. यासंबंधी अमेरिकेच्या धोरणकर्त्यांनी विचार करण्याची आवश्यकत आहे., अशीही सूचना कार्ती चिदंबरम यांनी केली.
भारताने घाबरु नये
अमेरिकेने प्रचंड कर लागू केले म्हणून भारताने घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेशी बोलताना भारताने आपल्या हिताच्या दृष्टीने मुद्दे उपस्थित केले पाहिजेत. देशहिताची कोणतीही तडजोड केली जाऊ नये. अमेरिकेच्या उत्पादनांना भारताच्या बाजारपेठेची आवश्यकता आहे. तर भारताच्या वस्तूंची आवश्यकता अमेरिकेच्या उद्योगांना आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांमध्ये व्यापार आजवर चालत आहे. हे सूत्र त्वरित थांबविता येणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
काही महिन्यांमध्ये चित्र स्पष्ट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या व्यापार शुल्क धोरणाच्या परिणाम स्पष्टपणे समोर येण्यासाठी आणखी काही महिने जावे लागणार आहेत. अमेरिकेच्या बाजारपेठांवर याचा किती परिणाम होणार आणि तो कसा होणार, यावर या धोरणाचे यशापयश अवलंबून राहणार आहे. तसेच भारतासारख्या देशांच्या व्यापारावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर याचा लघुकालीन आणि दीर्घकालीन परिणाम कोणता होईल, हे देखील या वर्षांच्या अखेरपर्यंत समजणार आहे. भारताने संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे, असे तज्ञांचे मत आहे.









