समुद्रात 13 तासांपर्यंत चालले अभियान
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेयर
भारतीय तटरक्षक दलाने 10 जुलै रोजी अंदमान आणि निकोबार बेटसमुहाच्या इंदिरा पॉइंटपासून 52 सागरी मैल अंतरावर संकटग्रस्त झालेली अमेरिकन नौका ‘सी एंजल’ आणि त्याच्या चालक दलाच्या दोन सदस्यांना वाचविले आहेत. नौकेत एक अमेरिकन अन् तुर्कियेचा नागरिक सवार होता. समुद्रात वादळी स्थितीमुळे ही नौका संकटात सापडली होती. भारतीय तटरक्षक दलाची नौका ‘राजवीर’ने या जोखिमयुक्त अभियानाला हाती घेत अमेरिकन नौकेला कॅम्पबेल बेपर्यंत सुरक्षित पोहोचविले.
पोर्ट ब्लेयरमधील तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राला (एमआरसीसी) चेन्नईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाकडून संकट सिग्नल मिळाला होता, नौका ‘सी एंजल’चे नुकसान झाले होते आणि त्याचा प्रोपेलर दोरखंडामुळे अडकल्याने पूर्णपणे काम करत नव्हता. एमआरसीसीने त्वरित आंतरराष्ट्रीय सुरक्षा नेटवर्क सक्रीय करत राजवीर नौकेला बचावासाठी रवाना केले. जोरदार वारे अन् उंच लाटांदरम्यान राजवीर नौका संकटग्रस्त नौकेपर्यंत पोहोचली होती.









