करांमध्ये मोठी कपात होणार, दोन्ही देशांची संमती
वृत्तसंस्था / जिनेव्हा
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संघर्ष आता निवळण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही देशांनी एकमेकांकडून आयात होणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणात करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात तब्बल 115 टक्क्यांची आहे. मात्र, हा करार तात्पुरता असून 90 दिवसांच्या नंतर त्याचा आढावा घेतला जाणार आहे. तोपर्यंत अमेरिका चीनच्या मालावर 30 टक्के कर लावणार असून चीन अमेरिकेच्या मालावर 10 टक्के आयातशुल्क आकारणार असल्याचे समजते.
दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींची जिनेव्हा येथे दोन दिवस चर्चा झाली. या चर्चेत या तात्पुरत्या कराराची रुपरेषा ठरविण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून होणाऱ्या आयातीवर 145 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. तर चीनने अमेरिकेच्या मालावर 125 कर लावण्याची घोषणा केली होती.
ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर…
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जगातील प्रत्येक देशाच्या अमेरिकेत येणाऱ्या मालावर कर वाढविले होते. चीनशी तर अमेरिकेचे व्यापारयुद्धच झाले होते. दोन्ही देशांनी एकमेकांच्या मालावर टप्प्याटप्प्याने आणि स्पर्धेने कर वाढविण्याचा सपाटाच लावला होता. मात्र, अशी व्यवस्था फार काळ टिकणार नाही, हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते. त्यानंतर साधारणत: 1 महिन्याने आता दोन्ही देशांनी हा संघर्ष तात्पुरता शांत केला आहे.
दोन्ही नेत्यांकडून घोषणा
जिनेव्हा येथे झालेल्या चर्चेत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि चीनचे उपाध्यक्ष ली फेंग यांनी भाग घेतला होता. कर कमी कसे करता येतील, या विषयांवर दोन्ही नेत्यांची सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर कर कमी करण्याची घोषणा करण्यात आली. चर्चा विस्तृत, स्पष्ट आणि सखोल अशा स्वरुपाची झाली, असे दोन्ही नेत्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
व्यापारयुद्ध थांबणार ?
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संघर्षाला अल्पविराम मिळाल्यानंतर आता अमेरिकेचे इतर देशांशी धोरण कोणते असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेने युरोपियन महासंघावरही वाढीव कर लावले आहेत. तथापि, चर्चा होत असल्याचे वृत्त आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या उदार व्यापार धोरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे. तथापि, आता हा व्यापार संघर्ष निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे तज्ञांचे मत आहे. मधल्या काळात जागतिक व्यापारात निर्माण झालेला गतीरोध आता टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता अमेरिका आणि चीन करारामुळे निर्माण झाली आहे.
भारताची बोलणी प्रगतीपथावर
भारत आणि अमेरिका यांच्यातही एक व्यापक व्यापार करार करण्याविषयी चर्चा केली जात आहे. ही चर्चा फेब्रुवारीपासूनच होत आहे. या वर्षअखेरीपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात पहलगाम हल्ल्यानंतर काही काळ भारताने संपूर्ण लक्ष ‘सिंदूर’ अभियानावर केंद्रीत केले होते. आता पुन्हा अमेरिकेशी चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे. मधल्या काळात भारताने ब्रिटनशी करमुक्त व्यापाराचा करार केला आहे. तसेच युरोपियन महासंघाशीही असा करार करण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात चर्चा केली जाणार आहे. अमेरिकेने आपल्या वाढीव कर आकारणीच्या धोरणाला 90 दिवसांचा विराम देण्याची घोषणा केली होती. हा कालावधी संपण्याच्या आतही भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराची घोषणा होणे शक्य आहे. भारतावर अमेरिकेने 26 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. मात्र, या करालाही 90 दिवसांचा विराम देण्यात आला आहे.








