ट्रम्प-क्षी जिनपिंग यांची मंजुरी शिल्लक : अमेरिकन कंपन्यांना दुर्लभ खनिजं मिळणार
वृत्तसंस्था/ लंडन
अमेरिका आणि चीन यांच्यात होत असलेल्या व्यापार चर्चेवर जवळपास सहमती निर्माण झाली आहे. एका व्यापार कराराच्या रुपरेषेवर सहमत झाल्याचे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता या कराराला अंतिम रुप देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
दोन्ही देश जिनिव्हा येथे झालेला करार आणि नेत्यांमधील चर्चेला अंमलात आणण्यासाठी तयार झाले आहेत असे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले. तर चीनचे व्यापार विषयक वरिष्ठ अधिकारी ली चेंगगांग यांनीही याचा पुनरुच्चार केला.
अलिकडेच दोन्ही देशांच्या अध्यक्षांदरम्यान फोनवर चर्चा झाली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव काहीप्रमाणात कमी झाला होता. यापूर्वी दोन्ही देशांनी परस्परांवर व्यापार कराराच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप केला होता. एप्रिल महिन्यात घोषित नव्या आयातशुल्काला 90 दिवसांसाठी स्थगित करण्याचा आणि काही जुने निर्णय मागे घेण्यावर मे महिन्यात स्वीत्झर्लंड येथे झालेल्या बैठकीत सहमती झाली होती.
अमेरिकेला अर्थ मिनरल्स मिळणार
या सहमतीमुळे रेयर अर्थ मिनरल्स आणि मॅग्नेट्सशी निगडित समस्यांवर तोडगा निघणार आहे. काही अमेरिकन आयात निर्बंध हटविण्यावरही चर्चा झाली आहे. आम्ही या कराराच्या रुपरेषेला अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर मांडणार आहोत. ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर हा करार लागू केला जाईल. तर दुसरीकडे चीन ही रुपरेषा अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासमोर मांडणार असल्याचे लुटनिक यांनी सांगितले. या करारामुळे अमेरिकेला रेयर अर्थ मिनरल्स मिळू शकतात. त्यांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने आणि सुरक्षा उपकरणांसाठी केला जातो.
रेयर अर्थ मिनरल्स
रेअर अर्थ एलिमेंट एकूण 17 असतात, ज्यात लँथेनम, नियोडियम, प्रासियोडियम यासारखी खनिजं सामील आहेत. या खनिजांमध्ये विशेष मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक गुणधर्म असतात, यामुळे ही खनिजं तांत्रिक उत्पादनांसाठी आवश्यक ठरतात. ही खनिजं जमिनीत खोलवर आढळून येत असल्याने त्यांना दुर्लभ मानले जाते. तसेच या खनिजांना बाहेर काढण्याची आणि त्यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया अत्यंत जटिल आणि महाग असते. रेयर अर्थ मिनरल्सचा वापर अनेक आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगक्षेत्रांमध्ये होतो. ज्यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहन, विंड टर्बाइन, सौरपॅनेल आणि बॅटरी सामील आहे. चीन रेयर अर्थ मिनरल्सचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जागतिक पुरवठ्याच्या जवळपास 60-70 टक्के हिस्स्यावर चीनचे नियंत्रण आहे.









