हमासचे समर्थन केल्याने कारवाई
वृत्तसंस्था/ .वॉशिंग्टन
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेणारी भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. अमेरिकन सरकारने तिच्यावर हमासला पाठिंबा देण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा ठपका ठेवला केला. 5 मार्च 2025 रोजी व्हिसा रद्द केल्यानंतर 11 मार्च रोजी तिने सीबीपी होम अॅपद्वारे स्वत:हून अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रंजनी ही फुलब्राइट स्कॉलर असून ती अमेरिकेत पीएच.डी. करत होती. तिने कोलंबिया विद्यापीठातून शहरी नियोजनात एम.फिल, हार्वर्ड विद्यापीठातून डिझाइनमध्ये मास्टर्स आणि भारतातील सीईपीटी विद्यापीठातून डिझाइनमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे.
रंजनी श्रीनिवासन ही विद्यार्थिनी हिंसा-दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि हमासला पाठिंबा देणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने जारी केली आहे. अमेरिकेच्या कडक पवित्र्यामुळे कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिला अमेरिका सोडावी लागली. ही घटना अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा एक भाग आहे.









