लष्करी तळांना केले लक्ष्य : ‘स्वसंरक्षणा’साठी पवित्रा : अमेरिकन लक्ष्यांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ तेहरान
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. या युद्धात अमेरिका थेट इस्रायलला मदत करत आहे. दरम्यान, नव्या आघाडीवर हल्ला झाल्याची बातमी आहे. अमेरिकेने सीरियावर हवाई हल्ला केल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. अमेरिकेच्या लष्कराने शुक्रवारी पहाटे पूर्व सीरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या दोन लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात या भागातील अमेरिकन लष्करी तळ आणि जवानांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेकडून हवाई हल्ले करण्यात आले.
अमेरिकेचे हवाई हल्ले या प्रदेशातील नाजूक संतुलन राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाचा निर्धार दर्शवतात. अमेरिकेला हल्ला करणाऱ्या संशयित इराण समर्थित गटांना लक्ष्य करायचे होते. इस्रायलने हमासविऊद्ध युद्ध पुकारले असताना अमेरिकेनेही आक्रमक रुप धारण करत हल्ले सुरू ठेवले आहेत.
पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, 17 ऑक्टोबरपासून इराकमधील अमेरिकन लष्करी तळ आणि जवानांवर किमान 12 आणि सीरियामध्ये चार हल्ले करण्यात आले आहेत. यातील दोन हल्ल्यांमध्ये 21 अमेरिकन जवान जखमी झाल्याचे हवाई दलाचे ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी सांगितले. अमेरिकेने केलेले हे हल्ले म्हणजे इराण-समर्थित गटांनी इराण आणि सीरियामधील अमेरिकन कर्मचाऱ्यांवर 17 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या आणि मुख्यत: अयशस्वी हल्ल्यांच्या मालिकेला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अशा हल्ल्यांचे निर्देश दिले होते. अमेरिका असे हल्ले सहन करणार नाही असा इशारा देतानाच आपल्या कर्मचारी आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी अमेरिका सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.









