पाकिस्तानला दाखवून दिली जागा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. अफगाणिस्तानच्या विदेश मंत्र्यांचा पाकिस्तान दौरा अमेरिकेने रोखला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेकडून तालिबानी नेत्यांवर असलेल्या प्रवास निर्बंधांमध्ये सूट देण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेने नकाराधिकार वापरला आहे. यामुळे अफगाणिस्तानचे विदेशमंत्री आमिर खान मुत्ताकी यांना स्वत:चा पाकिस्तान दौरा टाळावा लागला आहे. याचबरोबर अमेरिकेने पाकिस्तानच्या विदेश धोरणाला नियंत्रित करत असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.
अफगाणिस्तानच्या विदेश मंत्र्यांचा दौरा हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांतर्गत होणार होता, यापूर्वी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार हे काबूलच्या दौऱ्यावर गेले होते. इशाक डार यांच्या अफगाण दौऱ्याची व्यवस्था चीनने केली होती. त्या दौऱ्यादरम्यानच अफगाण विदेश मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर सहमती झाली होती. परंतु पाकिस्तान आणि चीनच्या या पूर्ण प्रयत्नांवर अमेरिकेने पाणी ओतले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद प्रस्ताव 1988 च्या अंतर्गत स्थापन समिती तालिबानशी निगडित लोकांचा प्रवास, संपत्ती आणि शस्त्रास्त्र निर्बंधांवर नजर ठेवते. तालिबानी नेत्यांना अफगाणिस्तानातून बाहेर जाण्यासाठी सुरक्षा परिषदेकडून प्रवास निर्बंधांमध्ये सूट मिळवावी लागते.
चीनचा वाढता दबदबा
अमेरिकेने स्वत:च्या निर्णयाला अखेरच्या क्षणापर्यंत टाळले आणि अखेर सूट देण्यास नकार दिला, यामुळे मुत्ताकी यांचा दौरा रद्द झाला. तालिबान सरकारसोबत चीनची वाढती जवळीक पाहता अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. अफगाणिस्तानात चीनचा दबदबा वाढू नये अशी अमेरिकेची इच्छा आहे.









