11 जणांचा मृत्यू : ड्रग्जच्या तस्करीचा संशय : ट्रम्प यांच्याकडून ‘आदेश’
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या बोटीवर हल्ला केल्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सदर बोटीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज म्हणजेच अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघड झाल्यानंतर कॅरिबियन समुद्रातून जाणारी बोट उद्ध्वस्त करण्यात आली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी या घटनेची माहिती देताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: बोटीवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. वेळप्रसंगी ती बोट जप्त करता आली असती, परंतु ट्रम्प यांनी ती उडवण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बोटीतील लोकांना कोणताही इशारा देण्यात आला नव्हता कारण ती बोट ‘कोकेन किंवा फेंटानिल’ ड्रग्जने भरलेली होती, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.
ड्रग्जचा माल जप्त केल्याने कार्टेलवर परिणाम होणार नाही. अमली पदार्थांची तस्करी रोखायची असल्यास ती अशापद्धताच्या कारवाया कराव्या लागतील, असेही रुबियो यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी अद्याप या हल्ल्याची सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र, तटरक्षक दल किंवा अमेरिकन नौदल ड्रग्जने भरलेल्या बोटी पकडत असताना अचानक हल्ला करून ती उद्ध्वस्त करण्यामागील नेमके कारण गुलदस्त्यातच आहे. डोनाल्ड ट्रम्प आक्रमक पावले उचलत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमेरिकन नौदलाने यापूर्वी आंतरराष्ट्रीय समुद्रात संशयास्पद जहाजे थांबवून त्यांची तपासणी केली आहे. परंतु मंगळवारी कॅरिबियन समुद्रात झालेला हा हल्ला पूर्णपणे वेगळा होता, कारण यावेळी थेट हल्ला करण्यात आला. ट्रम्प प्रशासनाने या कारवाईसाठी कोणतेही कायदेशीर कारण दिले नाही. बोटीत कोण होते आणि ते काय करत होते याची पूर्ण माहिती अधिकाऱ्यांना होती. तथापि, त्यांनी कोणतेही पुरावे दाखवले नाहीत, असे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी टीव्ही चॅनेलवर सांगितले.









