► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी शनिवारी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली. जयशंकर आणि सर्जियो गोर यांनी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. गोर हे अमेरिकेचे व्यवस्थापन आणि संसाधन उपसचिव मायकेल जे. रिगास यांच्यासोबत सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन सिनेटने गोर यांच्या भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदी नियुक्तीला मान्यता दिली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ट्रम्प यांनी गोर यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. तसेच त्यांच्यावर दक्षिण-मध्य आशियाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती.
सर्जियो गोर यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केले. ‘आज नवी दिल्लीत अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जियो गोर यांना भेटून आनंद झाला. आम्ही भारत-अमेरिका संबंध आणि त्यांचे जागतिक महत्त्व यावर चर्चा केली. त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा.’ अशा भावना जयशंकर यांनी व्यक्त केल्या आहेत.









