डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सोमालियातील तळ टार्गेट
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी सोमालियामध्ये इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार गोलिस पर्वत प्रदेशात हवाई हल्ले करण्यात आले असून त्यात अनेक संशयित ठार झाल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगेस्ट यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ‘मी सोमालियातील ‘आयएस’चे सूत्रधार आणि इतर दहशतवाद्यांवर अचूक लष्करी हवाई हल्ल्यांचे आदेश दिले,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘आयएस’ दहशतवादी छुप्या तळांमध्ये लपलेले असल्यामुळे त्यांच्यावर हवाई हल्ल्याचे आदेश देण्यात आले होते, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. गुहांमध्ये लपलेल्या संशयित दहशतवाद्यांनी अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांना धोका निर्माण केला आहे. आता आम्ही केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये गुहा उद्ध्वस्त झाल्या असून नागरिकांना कोणत्याही प्रकारे इजा न करता अनेक दहशतवादी मारले गेले, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.









