वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेने येमेन देशातील हुती दहशतवाद्यांच्या तळावर पुन्हा वायूहल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान 30 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता आहे. हुती दहतशवाद्यांनी अमेरिकेच्या व्यापारी नौकांवर हल्ला करुन त्या लुटण्याचा प्रयत्न क sल्याने अमेरिकेने ही कार्यवाही चालविली असून गेल्या दोन दिवसांमध्ये 53 हुतींचा बळी गेल्याचे स्पष्ट करण्यात आले. हुतींनी अमेरिकेच्या व्यापारी नौकांवरील हल्ले थांबविले नाहीत, तर त्यांना मोठा धडा शिकविला जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तीन दिवसांपूर्वी दिला होता. हुती ही इराणने पोसलेली दहशतवादी संघटना असल्याचा आरोप केला जात आहे. येमेन देशाच्या बहुतेक भागांवर आता हुती दहशतवाद्यांचा ताबा असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतही यंत्रणा या देशात उरलेली नाही. या संघटनेला नियंत्रणात आणल्याशिवाय तांबडा समुद्र आणि येमेनच्या सागरतटीय प्रदेशात शांतता नांदणे अशक्य असल्याची जाणीव झाल्याने अमेरिकेने हे प्रतिहल्ल्याचे पाऊल उचलले आहे.









