वृत्तसंस्था/ मॉन्टेव्हिडिओ
उरुग्वे, कोलंबिया व पराग्वे हे संघ 2026 मधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. उरुग्वे व कोलंबिया या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर 3-0 याच गोलफरकाने विजय मिळविले तर पराग्वेने आपला सामना गोलशून्य बरोबरीत सोडवून वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविली. अर्जेन्टिना, ब्राझील, इक्वेडोर याआधीच वर्ल्ड कप फायनलमध्ये स्थान मिळविले आहे. पेरूला आगेकूच करण्यासाठी शेवटच्या दोन सामन्यात विजय आवश्यक होते. पण उरुग्वेकडून पराभव स्वीकारावा लागल्याने ते या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. जेम्स रॉड्रिग्जने कोलंबियाला 31 व्या मिनिटाला आघाडीवर नेले तर जॉन कोर्डोबा व जुआन फर्नांडो क्विन्टेरो यांनी उत्तरार्धात एकेक गोल करीत बोलिव्हियावरील विजय निश्चित केला.
2022 मध्ये झालेल्या कतार वर्ल्ड कप स्पर्धा हुकल्यानंतर कोलंबियाने पुन्हा या स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची त्यांची ही सातवी वेळ असेल. 1962 मध्ये चिलीतील स्पर्धेत त्यांनी वर्ल्ड कप पदार्पण केले होते. 1990 व 1998 या कालावधीत सलग तीन वेळा वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळविले होते. त्यानंतर 2014 व 2018 त्यांनी याची पुनरावृत्ती केली होती. अन्य सामन्यात अर्जेन्टिनाने व्हेनेझुएलाचा 3-0, ब्राझीलने चिलीचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला.









