नगरपंचायतीचे प्रशासक प्रकाश गायकवाड यांना निवेदन
खानापूर : येथील वाजपेयीनगरमध्ये नागरी सुविधांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व राजेंद्र रायका यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्यावतीने नगरपंचायतीचे प्रभारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने वाजपेयीनगर येथे आश्र्रय योजना 2015 साली राबवण्यात आली. या ठिकाणी शहरातील बेघरांना भूखंड देवून घरे बांधण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते. या ठिकाणी प्लॉटधारकांनी घरे बांधली आहेत. मात्र या ठिकाणी कोणत्याच नागरी सुविधा नसल्याने वाजपेयीनगरमधील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात नगरपंचायतीकडून तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली. रस्ते, गटारी, विद्युतपुरवठा करण्यात यावा, तसेच या परिसरात शहरातील कचरा व घाण टाकण्यात येत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून या वसाहतीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच या कचऱ्याची उचल तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









