जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीने बैठक, केल्या सूचना
► प्रतिनिधी/ बेळगाव
उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा पिण्याचे पाणी तसेच जनावरांना लागणाऱ्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या. तातडीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाऊल उचला, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
पाणीटंचाई समस्येबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यामध्ये या सूचना करण्यात आल्या. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. जूननंतर पावसाला सुरुवात होते. तेव्हा येणारा दीड महिना प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करावे आणि पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगण्यात आले.
पाटबंधारे, हेस्कॉम, ग्रामीण विभागातील पाणी योजनेच्या अधिकाऱ्यांनी सतत लक्ष ठेवून व समन्वयाने काम करून पाणीटंचाई दूर करावी, असे सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहिरी खोदाई करा, कूपनलिकांची दुरुस्ती करा, असे देखील सांगण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कूपनलिका व विहिरींची यादी तयार करावी, त्या विहिरींमध्ये पाणी आहे की नाही? तसेच त्याची दुरुस्ती असल्यास त्याबाबत यादीमध्ये माहिती द्यावी, असे सांगितले.
या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अभियंते राठोड, हेस्कॉमचे अधीक्षक अभियंते गिरीधर कुलकर्णी, चिकोडी विभागातील अधिकारीही उपस्थित होते.









